हॉटेल अ‍ॅम्बेसेडरवर बेटिंगप्रकरणी छापा

By Admin | Updated: July 10, 2014 00:52 IST2014-07-10T00:51:08+5:302014-07-10T00:52:03+5:30

अरुण डोंगळेंवर गुन्हा : पुतण्यासह पाचजणांना अटक; सहा लाखांचे बेटिंग घेतल्याचे स्पष्ट

Print to betting on hotel ambassador | हॉटेल अ‍ॅम्बेसेडरवर बेटिंगप्रकरणी छापा

हॉटेल अ‍ॅम्बेसेडरवर बेटिंगप्रकरणी छापा

कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल अ‍ॅम्बेसेडरमध्ये लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास छापा टाकून दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या तिघा आरोपींसह हॉटेल मालक व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांचा पुतण्या धीरज डोंगळे याच्यासह पाचजणांना अटक केली. त्यांनी सुमारे सहा लाख सहा हजार रुपयांचे बेटिंग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईची माहिती शहरात पसरताच खळबळ माजली.
दरम्यान, हॉटेलमालक ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुणकुमार गणपतराव डोंगळे, त्यांचा भाऊ विजयसिंह गणपतराव डोंगळे यांच्या संमतीने बेटिंग घेतल्याच्या संशयावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल असा सुमारे सात लाख किमतीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. बेटिंग मालक बभू छाबडा व शरद कोराणे हे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहूपुरी येथील हॉटेल अ‍ॅम्बेसेडरमध्ये रूम नंबर २०५ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपली टीम घेऊन हॉटेलवर छापा टाकला. दरम्यान, हे हॉटेल शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिली. त्यांनी कारवाई करण्याचे आदेश देताच रूम नंबर २०५ मध्ये छापा टाकला असता गोपीचंद आहुजा, चेतन गिरवे, संजय छाबडा हे बेटिंग घेताना मिळून आले. छापा टाकला त्यावेळी टीव्हीवर सामन्यातील दहावे षटक सुरू होते. त्या कालावधीत त्यांनी सुमारे ६ लाख ६ हजार रुपयांचे बेटिंग घेतले होते. दक्षिण आफ्रिका
१ रुपये २० पैसे, तर श्रीलंका ६० पैसे दर लावला होता. यावेळी पोलिसांनी लॅपटॉप, टीव्ही, आठ मोबाईल, वही-पेन जप्त केले. त्यानंतर हॉटेलचा मालक धीरज डोंगळे व मॅनेजर सरदार कांबळे यांनाही अटक केली. अनेक दिवसांपासून बेटिंग घेत असल्याची माहिती संशयित आरोपींनी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या सर्व आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Print to betting on hotel ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.