फौंड्रीला लागणारे कच्च्या मालाचे दर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:09+5:302020-12-06T04:27:09+5:30
सतीश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क शिरोली : विदेशातून कच्च्या मालाची आयात थांबल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने ...

फौंड्रीला लागणारे कच्च्या मालाचे दर भडकले
सतीश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोली : विदेशातून कच्च्या मालाची आयात थांबल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने फौंड्रीला लागणारे पिग आयर्न, स्क्रॅप, कोळशाचे दर गगनाला भिडले असून ते प्रतिटन चार हजारांनी वाढले आहेत. दोन महिन्यांत चार वेळा दरवाढ झाली आहेे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या महामारीतही फौंड्री उद्योगाला मोठी तेजी असून ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर, कृषिपूरक उद्योग तेजीत आहेत. त्यामुळे फौंड्रीतील कास्टिंग उत्पादनही वाढले आहे. या उत्पादनासाठी प्रामुख्याने पिग आयर्न, स्क्रॅप, कोळसा स्टील, सिलिका, फेरो सिलिकॉन, फेरो मँगेनीज, सँड, आदी कच्चा माल लागतो. तो बहुतांश विदेशातून आयात होते; पण कोरोनामुळे आयात थांबली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आयर्न ओअर, पिग आयर्न, स्टीलची तसेच कच्च्या मालाची मागणी आणि दर वाढले आहेत. त्यामुळेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत चार वेळा दरवाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पिग आयर्न स्क्रॅप यांचा दर प्रतिटन ३२ हजार होता; तर कोळसा प्रतिटन २८ हजार होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये यात मोठी वाढ झाली. आज डिसेंबर महिन्यात पिग आयर्न स्क्रॅप, कोळसा यात प्रतिटन चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या पिग आयर्न सेसा गोवा आणि कर्नाटक होस्पेट येथून येते, तर कोळसा गुजरातमधून येतो. स्क्रॅपचा पुणे, मुंबई, बंगलोरवरून पुरवठा होतो. सिलिका सॅन्ड फोंडा (कणकवली), कर्नाटकातून येते. फौंड्रीत कास्टिंग तयार करण्यासाठी महिन्याला १६ हजार टन पिग आयर्न, १६ हजार टन स्क्रॅप, १५०० टन कोळसा, शंभरहून अधिक ट्रक सिलिका सँड लागते. तेव्हा महिन्याला ४० ते ५० हजार टन कास्टिंग तयार होते; पण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही कच्चा माल वेळेत उपलब्ध होत नाही. तसेच आणखी दरवाढीचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे फौंड्री उद्योजक चिंतेत आहेत.
प्रतिक्रिया :
कच्च्या मालाची आयात देशात मोठ्या प्रमाणात होते; पण कोरोनामुळे आयात थांबल्याने कच्चा मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या देशात असलेल्या कच्च्या मालाला मागणी वाढल्याने पिग आयर्न, स्क्रॅप, कोळसा यांचे दर प्रतिटन चार हजारांनी वाढले आहेत.
- एम. बी. शेख, उद्योजक
कच्च्या मालाची ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत दोनदा दरवाढ झाली आहे. कच्च्या मालाची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत; पण फौंड्री उद्योगांना कास्टिंगचे दर लगेच वाढवून मिळत नाहीत.
नीरज झंवर, फौंड्री उद्योजक
कच्च्या मालाचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. फौंड्रीला लागणारे स्क्रॅप तर उपलब्ध होत नाही. फौंड्री आणि ऑटोमोबाईल उद्योगांना चांगले दिवस आले होते. पण कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे उद्योजक संकटात सापडले आहेत.
- सुरेंद्र जैन, ज्येष्ठ उद्योजक