पालेभाज्यांचे दर गडगडले, ज्वारी महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:33+5:302020-12-07T04:17:33+5:30

कोल्हापूर : बाजारात पालेभाज्यांची तुफानी आवक झाली असून जागोजागी ढीगच ढीग दिसत आहेत. दरही कमालीचे गडगडले असून, १० रुपयांना ...

Prices of leafy vegetables plummeted, sorghum became more expensive | पालेभाज्यांचे दर गडगडले, ज्वारी महागली

पालेभाज्यांचे दर गडगडले, ज्वारी महागली

कोल्हापूर : बाजारात पालेभाज्यांची तुफानी आवक झाली असून जागोजागी ढीगच ढीग दिसत आहेत. दरही कमालीचे गडगडले असून, १० रुपयांना दोन ते तीन पेंढ्या असा दर झाला आहे. फळभाज्यांचीही आवक वाढल्याने दर घसरले असून ३० ते ४० रुपये किलो असा सर्वसाधारण दर आहे. कांदा-बटाटा अजूनही पन्नाशीच्याच घरात आहे. दर कमी झाल्याने किचन बजेट सावरले असतानाच ज्वारीने मात्र साठीपार उसळी घेतल्याने भाकरी परवडण्याच्या पलीकडे गेली आहे. ३८ ते ६० रुपये असा ज्वारीचा दर झाला आहे.

मेथी, पोकळा, शेपू, पालक, चाकवत, अंबाडा १० रुपयांना दोन पेंढ्या असा दर आहे. गेल्या आठवड्यात ३०० रुपये किलो असणाऱ्या हरभरा भाजीचे दर आता निम्म्यावर आले आहेत. ४० रुपये पावशेर असा दर आहे. शेवग्याची आवक वाढल्याने दरही १० रुपयांना तीन ते चार शेंगा असा झाला आहे. हिरव्या मिरचीचा दर १० रुपयांनी वाढू्न तो किलोला ५० रुपये झाला आहे. टोमॅटोही २० रुपये किलो आहे. आले ५० रुपये किलो आहे. कांदा अजूनही ४० ते ५० रुपये किलोवर स्थिर आहे. इजिप्तच्या कांद्यासह स्थानिक कांदाही बाजारात दिसत आहे; पण तो कच्चा असल्याने दरही कमी आहे. बटाट्याचे दर मात्र वाढतच आहेत. ५० रुपये असा दर झाला आहे.

मटारची आवक वाढली आहे. दर मात्र ५० रुपये किलो आहे. गवार १०० रुपये किलो आहे. उर्वरित सर्व भाज्या ३० ते ४० रुपये किलो आहे. फ्लॉवर अजूनही वाढूनच आहे. २० ते ५० रुपये एका गड्ड्याचा दर आहे.

चौकट ०१

फळबाजार फुललेलाच

फळांच्या बाजारात नागपूरच्या संत्र्यांची चलती आहे. ५० रुपयांना दोन किलो असा दर आहे. ॲपल बोरही २० रुपये किलो आहेत. केळी २० ते ३० रुपये डझन आहेत. माल्टाचीही आवक वाढली असून दरही ४० रुपये किलो आहे. तासगावची सीताफळे अजूनही १०० रुपये किलोच आहेत. सफरचंदांची आवक कमी झाली आहे, तर पेरूंची आवक वाढली आहे. अननसांचे ढीग लागले असून २० ते ३० रुपये दर आहे. काळ्या पाठीची कलिंगडेही दिसू लागली आहेत.

फोटो : नसीर अत्तार

फोटो: ०६१२२०२०-कोल-माल्टा

कोल्हापुरात लक्ष्मीपुरी बाजारात माल्ट्याची आवक वाढल्याने त्याचे असे ढीग दिसत आहेत.

फोटो: फोटो: ०६१२२०२०-कोल-भाज्या

बाजारात भाजीपाल्याची ढिगांनी आवक झाली आहे.

Web Title: Prices of leafy vegetables plummeted, sorghum became more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.