दरवाढीमुळे अडीच कोटी वीज ग्राहकांची दिशाभूल वाढलेले वीज दर कमी करणे शक्य--प्रताप होगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:00 IST2018-07-26T23:59:28+5:302018-07-27T00:00:13+5:30
महाराष्टतील २.५ कोटी वीज ग्राहकांवर ३० हजार ८४२ कोटी रुपयांची दरवाढ लादणाऱ्या महावितरणच्या प्रस्तावाच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा निर्णय मुंबई येथील वीज ग्राहक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी साधलेला थेट संवाद...

दरवाढीमुळे अडीच कोटी वीज ग्राहकांची दिशाभूल वाढलेले वीज दर कमी करणे शक्य--प्रताप होगाडे
महाराष्टतील २.५ कोटी वीज ग्राहकांवर ३० हजार ८४२ कोटी रुपयांची दरवाढ लादणाऱ्या महावितरणच्या प्रस्तावाच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा निर्णय मुंबई येथील वीज ग्राहक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : वीज दरवाढीची मागणी म्हणजे ग्राहकांची दिशाभूल कशी?
उत्तर : महावितरण कंपनीने दोन वर्षांत झालेला तोटा भरून काढण्यासाठी वीज दरवाढ मागितली आहे. त्यासाठी फक्त प्रतियुनिट फक्त ८ पैसे दरवाढ अशी जाहिरात केली आहे. कंपनीच्या दाखल प्रस्तावात दोन वर्षांची वीज विक्री २,१३,४०८ दशलक्ष युनिट असून, त्यासाठी ३०,८४५कोटी रुपये नुकसानभरपाई मागितली आहे. याचा स्पष्ट अर्थ सरासरी दरवाढ १.४५ रुपये प्रतियुनिट होतो. ही दरवाढ ६.६३ रुपये या वीजदराच्या तुलनेत २२ टक्के आहे.
प्रश्न : घरगुती वीज ग्राहक व उद्योगांना होणारी दरवाढ किती?
उत्तर : घरगुती वीज ग्राहकांसाठी महिन्याला शंभर युनिट्सपर्यंत व शंभर युनिट्सहून अधिक असे दोन प्रकारचे ग्राहक आहेत. दोन्ही ग्राहकांना सध्या सरासरी ४ रुपये ९० पैसे इतका दर पडत होता. तो ५ रुपये ७३ पैसे इतका होईल. म्हणजे ही दरवाढ ८३ पैसे म्हणजे २७ टक्के आहे. तसेच औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये उच्चदाब व लघुदाब असे दोन प्रकार आहेत. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सध्या ८ रुपये ६३ पैसे असणारी वीज सरासरी दहा रुपये दराने मिळेल. म्हणजे ही वाढ १६ टक्के आहे. लघुदाब उद्योगामध्ये २७ अश्वशक्तीवरील व २७ अश्वशक्तीखालील असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांना सध्या ९ रुपये २९ पैसे असणारी वीज ११ रुपये प्रतियुनिट, तर २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना ६ रुपये ३७ पैसे असलेली वीज ७ रुपये ०६ पैसे प्रतियुनिट म्हणजे अनुक्रमे १८.४ टक्के व ११ टक्के महाग होणार आहे.
प्रश्न : संभाव्य वीज दरवाढीमुळे कृषी पंपांच्या वीज दरात काय फरक पडेल?
उत्तर : कृषी पंपांमध्ये तीन अश्वशक्तीखालील व तीन अश्वशक्तीवरील, तसेच उच्चदाब असे तीन प्रकार पडतात. सद्य:स्थितीस तीन अश्वशक्तीखालील कृषी पंपांना १ रुपये १७ पैसे असा सवलतीचा दर आहे. हा दर २ रुपये ०६ पैसे इतका म्हणजे ७६ टक्के अधिक होईल. तीन अश्वशक्तीवरील वीज ग्राहकांना सध्या १ रुपये ४७ पैसे असणारा दर २ रुपये ३६ पैसे होईल. या दरामध्ये साठ टक्के वाढ होणार आहे, तर उच्चदाब कृषी पंपांसाठी सध्या २ रुपये ३० पैसे प्रतियुनिट असलेली वीज ३ रुपये ९० पैसे प्रतियुनिट म्हणजे ७० टक्के अधिक दराने मिळणार आहे.
प्रश्न : वाढलेल्या वीज दराचा राज्यातील उद्योगांवर काय परिणाम झाला आहे?
उत्तर : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑातील वीज दर २५ ते ३५ टक्के महाग आहेत. आणखीन वीज दरवाढीमुळे हे दर आता ४० टक्क्यांहून अधिक होणार असल्याने देशातील सर्वाधिक दर होतील. याचा परिणाम म्हणून राज्यातील उद्योजकांनी ‘मुक्त प्रवेश’ या पद्धतीने बाहेरील वीज (जी तुलनेने स्वस्त आहे) घेतली आहे. आठ वर्षांपूर्वी महावितरणकडील औद्योगिक वीज विक्री २५ हजार दशलक्ष युनिटपेक्षा अधिक होती. वास्तविक विकसित होणाºया उद्योगधंद्यांची गरज पाहता आठ वर्षांत उद्योगांची विजेची गरज ४० टक्क्यांनी वाढणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात ती २३ हजार दशलक्ष युनिटपर्यंत खाली आली आहे.
प्रश्न : वीज दरवाढ टाळण्यासाठी काय करता येईल?
उत्तर : महावितरणने कृषी पंपांचा वीज वापर दुप्पट दाखवून तिला वीज गळती असे गोंडस नाव दिले आहे. ज्यामध्ये काही बड्या वीज ग्राहकांनी केलेली वीज चोरी व काही कर्मचाºयांनी केलेला भ्रष्टाचार लपलेला आहे. वीज गळती १५ टक्के दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात ती ३० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे लपविण्यात आलेली वीज गळती १५ टक्के याचा अर्थ तिची किंमत ९ हजार कोटी रुपये इतकी होते. यामागे काही बडे वीज ग्राहक व कर्मचारी आहेत. महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ दरवर्षी सहा हजार कोटी रुपये इतकी मागितली आहे; पण १५ टक्के वीज गळती कमी केल्यास महावितरणला नऊ हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळेल. म्हणजे सहा हजार कोटी रुपये मिळतीलच; पण उर्वरित तीन हजार कोटी रुपयांतून सध्या वाढलेले वीज दर कमी करणे शक्य आहे. मात्र, या सर्वांसाठी सरकारकडे प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे; अन्यथा वीज दरवाढीचे परिणाम राज्यातील तेरा कोटी जनतेला भोगावे लागतील.
- राजाराम पाटील