‘टीपूर’साठी गावांमध्ये जय्यत तयारी
By Admin | Updated: November 24, 2015 00:27 IST2015-11-23T23:34:12+5:302015-11-24T00:27:20+5:30
कुंभारवाड्यात पणत्या : नौबतीच्या तालावर दीपोत्सवाला प्रारंभ

‘टीपूर’साठी गावांमध्ये जय्यत तयारी
कुवे : टीपूर पाजळवायचा म्हटलं की, गावागावात भोपळ्याची शोधाशोध सुरु होते. कुंभारवाड्यात पणत्या वेगाने तयार होतात. देवाला तेलही येते. अवघे गाव काही तासात जमा होते. गावाला यात्रेचे रुप येते. नौबतीच्या तालावर दीपोत्सवाला प्रारंभ होतो. त्रिपुरारी पौर्णिमेलाच ‘टीपूर पौर्णिमा’ म्हटले जाते.
एरव्ही देवळासमोर उभ्या असणाऱ्या दीपमाळा या त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने उजळून निघतात. तळकोकणातील प्रत्येक गावात टीपूर साजरा होतो. लांजा तालुक्यातील पूनस, उपळे, इंदवटी, इसवली, कोंड्ये आदींसह इतर गावात हा उत्सव साजरा होतो.
कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. देवळात व घराबाहेर दिवे लावतात. देवस्थानच्या दीपमाळा पाजळणे, यालाच टिपूर पाजळणे, असे म्हणतात. कोकणात या उत्सवाचा दिमाख काही वेगळाच असतो. प्रत्येक ग्रामदेवतेला तेलाची आंघोळ घातली जाते. दीपांचा उत्सव करतानाच दीपमाळा प्रज्वलीत केल्या जातात. टीपराचा उत्सव म्हणजे गावातला मोठा उत्सव. बारा बलुतेदारांपैकी तेली मंडळी तेल घेऊन देवळात येतात. कुंभार पणत्या आणतात, शिंपी वाती आणतात आणि मग ढोलांचा गजर सुरु होतो. नौबत झडते तशी गावातली रयत एकत्र येते. टीपराच्या पूर्वसंध्येला समरत्वाचे प्रयोजन होते. डाळ, भाताची रानपानावर पंगत सुरु होते. त्यानंतर चंद्राच्या झगमगत्या प्रकाशात टीपूर सुरु होतो. मशाली फिरु लागतात, गावकरी पुढे येतात, तरंग हलू लागतात, गावात जल्लोष सुरु होतो. चंद्र वर येतो तसा उत्साह वाढतो. पाषाणांना तेलाची आंघोळ घातली जाते. प्रत्येक देवासमोर व मंदिरात दीपमाळावर पणत्या चढू लागतात आणि मग दीपोत्सवाला सुरुवात होते. (वार्ताहर)