कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नागपुरातील प्रशांत कोरटकर याच्या अटकेचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.कोरटकर याने २५ फेब्रुवारीला रात्री सावंत यांना मोबाइलवरून धमकी दिली. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले. त्यानंतर सावंत यांच्या फिर्यादीवरून कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोरटकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता.त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी केली. सावंत यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी कोरटकर याने केलेले वक्तव्य गंभीर आहे, त्याला कायद्याची भीती नाही, राष्ट्रपुरुषांबद्दल त्याच्या मनात द्वेष आहे. मोबाइलमधील डेटा डिलिट करून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जामीन नाकारावा, असा युक्तिवाद केला होता. मंगळवारी न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज नामंजूर केला.त्यानंतर त्याचे वकील सौरभ घाग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून सात दिवसांची मुदत मागितली. याला सरकारी वकील शुक्ल यांनी विरोध केला. परिणामी, न्यायालयाने कोरटकर याचा जामीन नामंजूर केला, तरीही पुन्हा कोरटकर याच्या वकिलांनी एका खटल्याचा संदर्भ देत ७२ तासांची तरी मुदत द्यावी, अशी विनंती केली. यावर सरकारी वकील शुक्ल यांनी मुदत मागण्यासाठी आरोपी न्यायालयासमोर हजर असावा लागतो. येथे आरोपी हजर नाही. त्यामुळे न्यायालयाने एकदा जामीन नामंजूर केल्यानंतर पुन्हा जामिनासाठी मुदत देऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून ७२ तासांचीही मुदत न्यायालयाने नाकारली.
प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्याला सात दिवसांची मागितलेली मुदतही फेटाळली आहे. यामुळे अटक करता येते. -ॲड. विवेक शुक्ल, सरकारी वकील, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ यांच्याबद्दल कोरटकर याने हीन, विकृत विधाने केली होती. कोरटकर याच्याविरोधात फिर्याद दिली होती. कायद्याचा आधार घेऊन तो अटकेपासून बचाव करीत होता. आता त्याचा जमीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी तातडीने त्याला अटक करावी. -इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक, कोल्हापूर