कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (वय ५०, रा. बेचा परिसर नागपूर) याच्या आवाजाचे नमुने बुधवारी (दि. २६) फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी घेतले. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी त्याची पाच तास कसून चौकशी केली. मोबाइलमधील डेटा स्वत: डिलिट केल्याची त्याने कबुली दिली असून, अटक टाळण्यासाठी तो हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.कोरटकर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. कोठडीदरम्यान राजारामपुरी पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी फॉरेन्सिकच्या दोन अधिका-यांनी कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. त्याने फिर्यादी सावंत यांच्याशी मोबाइलवरून केलेला संवाद पोलिसांनी लिहून काढला आहे. संवादाची प्रत त्याच्याकडून वाचून घेण्यात आली. त्याच्यासह आणखी चौघांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. नमुने घेण्याची प्रक्रिया सुमारे सहा तास चालली. दरम्यान, सावंत यांना आपणच फोन केला होता. याबाबत गुन्हा दाखल होताच मोबाइलमधील संभाषणाचा डेटा स्वत:च डिलिट केल्याची कबुली त्याने चौकशीत दिल्याचे सूत्रांकडून समजले.दरम्यान, पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी मंगळवारी रात्री १२ ते ३ आणि बुधवारी सकाळी ६ ते ८ पर्यंत कोरटकरवर प्रश्नांची सरबत्ती करून त्याची चौकशी केली. पसार काळात तो कुठे होता? कोणाच्या संपर्कात होता? त्याला कोणाची मदत झाली? याती माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.अशी होणार आवाजाची तपासणीसंशयित कोरटकरसह आणखी चौघांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. फिर्यादी सावंत यांच्याही आवाजाचे नमुने तीन आठवड्यांपूर्वीच घेतले आहे. या सर्व नमुन्यांची कसबा बावडा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पडताळणी केली जात आहे. मूळ संभाषण आणि घेतलेल्या नमुन्यांमधील आवाजाचा पोत, चढ, उतार, बोलण्याची पद्धत, विशिष्ठ स्वर आणि व्यंजनांचा उच्चार करण्याची पद्धत यांचे शास्त्रीय विश्लेषण केले जाईल. त्यानंतर तंतोतंत जुळणारा आवाज कोणाचा आहे, याचे निष्कर्ष काढले जातील. फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून अंतिम अहवाल जुना राजवाडा पोलिस ठाण्याला पाठवला जाईल. चार ते सहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कडेकोट बंदोबस्तकोरटकरची राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केल्यापासून पोलिस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. चौकशी केल्याशिवाय कोणालाही पोलिस ठाण्यात जाण्याची परवानगी दिली जात नाही. संतप्त शिवप्रेमींकडून त्याच्यावर हल्ल्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
फिर्यादी सावंत यांचे पत्रफिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना बुधवारी पत्र पाठविले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील आणि कोरटकरला ठेवलेल्या पोलिस कोठडीच्या बाहेरील तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
चेन्नईला पळून जाण्याची तयारीकोरटकर हा हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता. यासाठीच तो तेलंगणातील मंचरियाल रेल्वे स्टेशनला गेला होता. अंतरिम जामीन रद्द झाल्यापासून त्याने मोबाइल आणि सोशल मीडियाचा वापर बंद केला होता. या काळात त्याने ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणेही टाळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.