शिक्षक संघाला सत्तेचा ‘प्रसाद’ कडूच !
By Admin | Updated: April 6, 2015 01:14 IST2015-04-06T01:09:39+5:302015-04-06T01:14:16+5:30
वरुटेंचा पराभव जिव्हारी : आत्मविश्वास नडल्याने ‘परिवर्तन’ला अपयश; ‘समविचारी’तच नेतृत्वाचा वाद

शिक्षक संघाला सत्तेचा ‘प्रसाद’ कडूच !
$$्निराजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
प्राथमिक शिक्षक बॅँकेत सत्ता अबाधित राखण्यात राजाराम वरुटे यांना यश आले असले तरी शिक्षक संघ व करवीर तालुक्यातील अंतर्गत राजकारण थोपविण्यात त्यांना यश आले नाही. पॅनेल बांधणीत गणिते चुकूनही सुरुवातीपासून निर्माण केलेली हवा मतपेटीपर्यंत पोहोचविण्यात विरोधकांचा आत्मविश्वास नडल्यानेच त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागले. निकाल पाहता, तो राजाराम वरुटेंना आत्मचिंतन करून पुढील बांधणी करायला लावणारा, तर विरोधकांची चिंता वाढविणारा ठरला आहे.
बॅँकेसाठी पॅनेल जाहीर केल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे निवडणुकीत शेवटपर्यंत रंगत राहिली. शिक्षक समिती-पुरोगामीच्या आघाडीत बराच वेळ गेला. त्यातच उमेदवारी निवडीत एकमत न झाल्याने राधानगरी, शाहूवाडी, चंदगड व पन्हाळामध्ये या पॅनेलला मोठा फटका बसला. समितीचे राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील यांची बंडखोरी, जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी व ‘कास्ट्राईब’ला डावलल्याने त्याची किंमत मोजावी लागली. प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांनी सत्तारूढ गटावर जोरदार हल्ला चढवीत चांगली हवा तयार केली; पण गेल्या निवडणुकीतील आकडेवारी या नेत्यांच्या डोक्यात राहिल्याने त्यांचे या निवडणुकीतील सत्तेचे गणित चुकले. त्यातच ‘पुरोगामी’चे रवी शेंडे व मनोजकुमार रणदिवे यांची बंडखोरी फारच महागात पडली. सत्तारूढ गटाचे नेते राजाराम वरुटे यांनी पॅनेल बांधणीत कमालीचा चाणाक्षपणा दाखविला. शिरोळमध्ये रवी पाटील यांचे बंड थोपविण्यात वरुटेंना अपयश आले. त्याचा फटका शिरोळमध्ये बसला. करवीरमध्ये त्यांना अपेक्षित पाठबळ मिळाले नाही; पण इतर चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांनी साथ दिल्याने विजयापर्यंत पोहोचू शकले.
‘समविचारी’ पॅनेलमध्ये सुरुवातीपासून गोंधळ सुरू होता. नेतृत्व कोणी करायचे, हा प्रश्न सुटेपर्यंत बॅँकेची निवडणूक कधी संपली हे त्यांनाच कळले नाही. बॅँकेच्या २००९ पूर्वीच्या कारभार केलेल्या मंडळींनी प्रचाराची सूत्रे हातात घेतल्याने पराभव झाल्याची चर्चा संघाच्या कार्यकर्त्यांत आहे. समितीचे जोतिराम पाटील, संघाचे रघुनाथ खोत व रवी पाटील यांचे पाठबळ मिळाल्याने अनपेक्षितपणे पॅनेलची ताकद वाढल्याने नेत्यांचा आत्मविश्वास वाढला; पण सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.