प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांचा निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:52+5:302021-09-02T04:50:52+5:30
गारगोटी : महापूर, कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून प्रांताधिकारी डॉ. ...

प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांचा निरोप समारंभ
गारगोटी : महापूर, कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील जनतेच्या मनात शासकीय व्यवस्थेबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. अधिकारी हा जनतेचा सेवक असतो याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉ. खिलारी आहेत, असे गौरवोद्गार अध्यक्षीय भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी काढले. त्या डॉ. खिलारी यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षांचे पदाधिकारी होते.
यावेळी डॉ. खिलारी म्हणाले, हा तालुका नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. येथे जनता नेहमी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यामुळेच अनेक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करताना कोणतीही अडचण भासली नाही. या जनतेच्या पाठबळावर आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे जिल्ह्यात नावलौकिक झाला व पुरस्कार मिळाला.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम, संतोष मेंगाणे, प्रा. अर्जुन आबिटकर, माजी जि.प. सदस्य राहुल देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, सत्यजित जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे, किरण चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, माजी सरपंच आनंदराव आबिटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, गटविकास अधिकारी एस. जे. पवार, नायब तहसीलदार ,तलाठी संघटनेचे अध्यक्ष एफ. आय. भटारे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, संदीप आबिटकर, नेताजी गुरव, पोलीस पाटील संघटना, सर्व तलाठी, महसूल कर्मचारी, तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन आणि आभार टी. डी. पाटील यांनी मानले.
फोटो ओळ प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी यांचा महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी सत्कार केला. यावेळी एफ. आय. भटोरे, अर्जुन आबिटकर, संजय मोरे आदी उपस्थित होते.