Maharashtra Assembly Election 2019 युतीला ब्रेक, आघाडीची गाडी सुसाट : कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:19 PM2019-10-23T13:19:41+5:302019-10-23T13:24:57+5:30

कोल्हापूर उत्तर’मध्ये मधुरिमाराजे यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत राहिले; परंतु त्या लढणार नाहीत आणि ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमध्ये शिफ्ट झाल्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांचा मार्ग एकदमच खुला झाला; परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मूळचे भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढतीत रंग भरला.

 Potential breaks in Alliance brass, front train in Susat district: | Maharashtra Assembly Election 2019 युतीला ब्रेक, आघाडीची गाडी सुसाट : कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य चित्र

Maharashtra Assembly Election 2019 युतीला ब्रेक, आघाडीची गाडी सुसाट : कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य चित्र

Next
ठळक मुद्देबंडखोरांमुळे अनेक मतदारसंघांतील गणिते बदललीकागलमध्ये ही लढत तिरंगी व्हावी यासाठीच मुश्रीफ यांनी ज्या जोडण्या लावल्या, त्या यशस्वी झाल्या.

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील दहाही जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी, या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या घोडदौडीला ब्रेक लागेल अशी चिन्हे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाढतील असे दिसत असून, दोन मतदारसंघांत अपक्षांची हवा तयार झाली आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक व काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यामध्ये ‘बिग फाईट’ होत असल्याने विजयाची समान संधी दिसते, हे खरे असले तरी त्यातही काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे बाजी मारतील, असाही एक अंदाज आहे. शेवटच्या दोन दिवसांत बहुतांशी सर्वच मतदार संघात उमेदवारांनी हात सैल सोडले, त्यामुळेही निकाल उलटेसुलटे होवू शकतात. वंचित फॅक्टर प्रत्येक मतदार संघात किती घुसतो यावर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.

जिल्ह्यात अत्यंत ईर्षेने सोमवारी (दि. २१) सरासरी ७४ टक्के मतदान झाले. मतदारसंघात प्रत्यक्ष फिरल्यानंतर जाणवलेले चित्र, प्रचारात तयार झालेली हवा, उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या आणि एकूण जनमानस काय होते, याचा ठोकताळा बांधून ‘लोकमत’ने हे संभाव्य चित्र देण्याचा प्रयत्न केला आहे. हे असेच घडेल असेही नाही. शेवटी ‘एक्झिट पोल’सारखा हा एक अंदाज आहे. गुरुवारी (दि. २४) दुपारी मतयंत्रांत काय आहे, हे स्पष्ट होणार आहे; त्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे; परंतु त्याआधी साधारणपणे जिल्ह्याचा राजकीय मूड काय होता व जो विविध माध्यमांतून व्यक्त झाला, त्या आधारे हे निकालाचे भाकीत मांडले आहे.

‘कोल्हापूर उत्तर’मध्ये मधुरिमाराजे यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत राहिले; परंतु त्या लढणार नाहीत आणि ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमध्ये शिफ्ट झाल्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांचा मार्ग एकदमच खुला झाला; परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मूळचे भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढतीत रंग भरला. ते मूळचे मंगळवार पेठेचे, व्यवसायाने उद्योजक, फुटबॉलपटू आणि नवीन चेहरा यांमुळे त्यांनी चांगलीच हवा निर्माण केली. आमदार क्षीरसागर यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला तरी जाधव आपली उमेदवारी ठाशीवपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आणि शेवटच्या जोडण्या लावण्यात कमी पडल्याचे चित्र दिसते. भाजप-ताराराणी आघाडी प्रचारात ज्या ताकदीने आमदारांच्या पाठीशी राहिली, ती मतांपर्यंत गेली असल्यास आमदार क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक होईल, असे चित्र आहे.

‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये दोन्ही उमेदवार अत्यंत तगडे आहेत. गंमत म्हणजे त्यांनी दोघांनीही एकमेकांवर एका वाक्यानेही टीका केलेली नाही. ही लढत सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट अशीच झाली. ऋतुराज पाटील यांची ही पहिली निवडणूक असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे; तसेच विधान परिषद, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाडिक गटालासुद्धा राजकारणात टिकून राहण्यासाठी हा विजय तितकाच महत्त्वाचा आहे. जसे अमल यांच्याबद्दल फारसे नकारात्मक मुद्दे नव्हते, तसेच ते ऋतुराज यांच्याबद्दलही नव्हते. भाजपचे सरकार येणार याबद्दल किंवा अजूनही मोदी-फडणवीस यांच्याबद्दल क्रेझ आहे; तशीच गेल्या निवडणुकीइतकी काँग्रेसबद्दलही नकारात्मक भावना नव्हती. अनेक गावांत दोन्ही गटांकडून घासून मतदान झाले आहे. जे काही करणे, वाटणे आवश्यक होते, ते दोन्हींकडून झाले आहे. त्यामुळेच निकालाबाबत छातीठोकपणे काही सांगणे अवघड बनले आहे. तरुणाईमध्ये ऋतुराज यांच्याबद्दल असलेली क्रेझ, शिवसेनेचा उघड पाठिंबा, बाहेरगावचे एकेक मतदान आणण्यासाठी लावलेली यंत्रणा अशा काही गोष्टींचा विचार करून ऋतुराज पुढे राहतील, असे चित्र दिसते आहे.

करवीर मतदारसंघात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात या वेळेला कोण टिकणार नाही, अशीच हवा होती. त्यात महापुरात त्यांनी केलेले काम, प्रचंड लोकसंपर्क, विकासकामांच्या पातळीवरील पाठपुरावा या गोष्टीही त्यांच्या पाठीशी होत्या. प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यावर एकदमच ‘यावेळेला पीएन’ अशी हवा तयार झाली. त्यात दोन्ही काँग्रेसने बांधलेली मूठ, स्वाभिमानी संघटनेची मदत, गगनबावड्यात पी. जी. शिंदे गटाचा उघड पाठिंबा, आमदार सतेज पाटील यांनी केलेले काम अशा अनेक गोष्टी जमून आल्याचे दिसत आहे. पन्हाळा हा नरके यांचा गड मानला गेला; परंतु तिथेच या निवडणुकीत त्यांना हादरे बसल्याचे दिसले. आता हे सगळे मतांत परिवर्तन झाले असल्यास ‘पी. एन.’ यांचा विजय होईल, असे स्पष्ट दिसते.

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध अपक्ष समरजित घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यात लढत झाली. तिथे ही लढत तिरंगी व्हावी यासाठीच मुश्रीफ यांनी ज्या जोडण्या लावल्या, त्या यशस्वी झाल्या. समरजित घाटगे यांची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ होती, मतदारसंघाचे भवितव्य म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. सोशल मीडियापासून प्रत्यक्ष लढाईतही ते कायमच मुश्रीफ यांच्यापेक्षा पुढे राहिले; परंतु संभाव्य मतविभागणी, ‘आमचं ठरलंय’चा परिणाम म्हणून मुश्रीफ यांना विजयाचा विश्वास वाटतो. संजय घाटगे हे स्पर्धेत राहणार नाहीत व त्यांची मते मूळच्या घाटगे गटाकडे जातील, असे एक गणित मांडले जात होते; परंतु प्रत्यक्षात तसे घडलेले दिसत नाही.
राधानगरीत उमेदवारांची भाऊगर्दी झाली तरी शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विरुद्ध राष्ट्रवादीचे के. पी. पाटील अशीच लढत तिथे झाली. आबिटकर यांच्याबद्दल फारसे नकारात्मक वातावरण नव्हते. चांगला संपर्क आहे. सगळेच प्रश्न सुटलेले नाहीत; परंतु किमान त्यासाठी काही धडपड केली, असे तेथील लोकांना वाटत होते. गेल्या निवडणुकीत राहुल देसाई, अरुण डोंगळे यांनी के. पी. पाटील यांना पाठिंबा दिला होता; परंतु लोकांनी आबिटकर यांना मते दिली. या वेळेला हे दोघेही रिंगणात होते. जीवन पाटील हे के. पी. पाटील यांच्यासोबत होते, ते ‘वंचित’चे उमेदवार राहिले. के. जी. नांदेकर गट या वेळेला आबिटकर यांच्यासोबत राहिला. सत्यजित पाटील गट गत निवडणुकीत आबिटकर यांच्यासोबत होता, तो उलटा गेला. अशा काही बेरीज-वजाबाक्या झाल्या आहेत.

चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध अपक्ष शिवाजी पाटील यांच्यातच लढत झाली. ‘वंचित’चे अप्पी पाटील, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, ‘जनसुराज्य’चे अशोक चराटी यांनी हवा निर्माण केली तरी विजयाला गवसणी घालण्याइतके बळ त्यांना मिळालेले नाही. गडहिंग्लजमध्ये अप्पी पाटील यांनी जास्त मते घेतल्यास त्याचा फटका राजेश पाटील यांना बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही; परंतु एकूण नवे नेतृत्व म्हणून राजेश पाटील यांची हवा तयार झाली असून, त्या बळावर ते विजयापर्यंत जातील असे दिसते.

शाहूवाडीमध्ये विनय कोरे यांनी या निवडणुकीत अनेक बेरजा केल्या आहेत. पन्हाळ्यात मतविभागणी होणार नाही याची काळजी घेतली. शाहूवाडीत आमदार सत्यजित पाटील यांना जास्त मताधिक्य मिळणार नाही, अशी दक्षता घेतली. आमदार सत्यजित यांच्याबद्दलही मतदारसंघात फारसे नकारात्मक वातावरण नव्हते. शिवाय पन्हाळ््यातून डॉ.जयंत पाटील-भारत पाटील गटाने त्यांना पाठिंबा दिला. शाहूवाडीत आपल्या गटाचे चांगले मतदान झाल्याने कांही झाले तरी आम्ही जिंकू असे आमदार गटाला वाटते. ‘वारणे’च्या बिलाबाबत निवडणुकीत चर्चा झाली. तो एकच नकारात्मक मुद्दा कोरे यांच्याविरोधात होता.

हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे सुजित मिणचेकर विरुद्ध काँग्रेसचे राजूबाबा आवळे व ‘जनसुराज्य’चे अशोक माने यांच्यात अखेरच्या टप्प्यात लढत झाली. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच मिणचेकर नकोत, असे वातावरण तयार झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत ताकदीने काँग्रेससोबत राहिली आहे. मूळचा काँग्रेसचा मतदार, त्यास ‘स्वाभिमानी’सह अन्य गटांचा मिळालेला पाठिंबा व एकगठ्ठा समाज पाठीशी राहिल्याने राजूबाबा यांना गुलाल लागेल, असे चित्र दिसते.

इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांनी चक्क काँग्रेसचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून ‘प्रेशर कुकर’ हातात घेतल्याने ते मतदारसंघात ‘प्रेशर’ तयार करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. आमदार सुरेश हाळवणकर यांचे बोलणे व कामांतूनही नकारात्मक वातावरण तयार झाले. पारंपरिक हिंदुत्ववादी मतांची फूट व या पक्षाला मानणारा वर्ग त्यांच्यापासून बाजूला गेल्याने आवाडे यांना गुलाल लागेल, असे चित्र आहे. ‘मी निवडून आल्यावर भाजपलाच पाठिंबा देणार,’ हा आवाडे यांच्याकडून झालेला प्रचारही कळीचा ठरला. भाजपचे कमिटेड मतदान विचलित न झाल्यास हाळवणकर हेच बाजी मारतील.

शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांच्यातच जोरदार लढत झाली. चळवळ टिकली पाहिजे, अशी भूमिका घेऊन स्वाभिमानी मैदानात उतरली. त्या भूमिकेला शेतकऱ्यांनी बळ दिल्यास सावकर मादनाईक विजयी होतील. यड्रावकर यांचे वडील दोन वेळा व ते स्वत: दोन वेळा


वेळा पराभूत झाले. त्यामुळे त्यांना एक संधी देऊ, असाही विचार झाला आहे. काँग्रेसच्या गणपतराव पाटील गटाने ‘स्वाभिमानी’ला प्रामाणिकपणे पाठिंबा दिला असला तरी लोक कारखान्यास आम्ही तुमच्यासोबत; परंतु या वेळेला यड्रावकर असे म्हणत होते. तसे झाल्यास यड्रावकर पुढे सरकतील. शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी एकाकी खिंड लढविली. बहुजन आघाडीने त्यांच्याविरोधात अनिल यादव यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे आघाडीच्या मतांत फूट पडली; परंतु आघाडीच्या नेत्यांना जे साध्य करायचे होते, ते त्यांनी केले असेच म्हणावे लागेल.

संभाव्य निकाल

  • कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर
  • कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील व अमल महाडिक समान संधी
  • करवीर : पी. एन. पाटील (काँग्रेस)
  • कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
  • राधानगरी : प्रकाश आबिटकर (शिवसेना)
  • चंदगड : राजेश पाटील (राष्ट्रवादी)
  • शाहूवाडी : विनय कोरे (जनसुराज्य शक्ती)
  • हातकणंगले : राजूबाबा आवळे (काँग्रेस)
  • इचलकरंजी : प्रकाश आवाडे (अपक्ष)
  • शिरोळ : राजेंद्र यड्रावकर (अपक्ष).

 

Web Title:  Potential breaks in Alliance brass, front train in Susat district:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.