जमिनीला कवडीचा भाव

By Admin | Updated: July 17, 2014 00:15 IST2014-07-17T00:10:11+5:302014-07-17T00:15:45+5:30

भूमिपुत्रांना धोका : गगनबावड्याला जमीन एजंटांचा विळखा

Possession of land | जमिनीला कवडीचा भाव

जमिनीला कवडीचा भाव

चंद्रकात पाटील - गगनबावडा
गगनबावडा परिसरात भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत कराडो रुपयांचा जमीन व्यवहार करून देणाऱ्या एजंटांंचा सुळसुळाट सुरू आहे. भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत करोडो रुपयांच्या जमिनी कवडी मोलाने धनदांडग्यांच्या हवाली होत आहेत. प्राप्त माहितीनुसार या परिसरातील निम्म्यांहून अधिक भूमिपुत्रांनी एजटांना भुलून जमिनी विकल्या आहेत. काही वर्षांत उर्वरित जमिनीही त्यांच्याकडून बळकावल्या जाण्याची शक्यता आहे. परिणामी डोंगर माथ्यावरील भूमिपुत्रच येथे भूमिहीन होणार आहेत.
कोल्हापूर शहरापासून ३५-४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्यटन स्थळ परिसरात काही वर्षांपूर्वी केवळ हौस म्हणून काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जमिनी खरेदी केल्या. हा व्यवहार त्यावेळी हजोरांच्या घरात झाला. दळणवळणाच्या सुविधा आणि भविष्यात दगडधोंड्याच्या जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळणार या अपेक्षेने अनेकांच्या नजरा या जमिनीकडे वळल्या.
पैसेवाल्यांनी थेट डोंगर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मोलमजुरी आणि जमिनीतील सुके गवत विकून जगणारा भूमिपुत्र मालामाल होऊ लागला. ठरावीक जणांच्या खिशात पैसा खेळू लागल्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले. जमिनीच्या विक्रीचा हळूहळू धंदा झाला. शहरात जाऊन थोडेफार शहाणे आणि व्यवहार ज्ञान असणाऱ्या जाणकारांनी मोर्चा गावाकडे वळविला आणि एजंटांचा उदय झाला.
गगनबावडा, असळज, बोरबेट, कोदे, अणदूर रस्त्यावर एखादी आलिशान गाडी उभी राहिली की, या एजटांनी त्यांना गाठलेच. दोघांतील चर्चेतून जागा पाहिजे म्हटल्यावर गरजू शेतमालकांच्या परस्पर जमिनी दाखवून सौदा ठरू लागला. हा सौदा मोठ्या किमतीला ठरवून मग ही मंडळी त्यांच्या गाडीतून मूळ शेतमालकांच्या घरी जातात. मोठे सायब हायती, तुमची जमीन त्यांना पसंद पडलिया तवा तुम्ही काय करणार? चांगला भाव मिळतोय देऊन टाका. तुमच्या अडी-अडचणीला ते मदत करतील, यासह त्यांच्या घरातील समस्या, कठीण प्रसंग सांगून त्याला हे दलाल दररोज भेटून बेजार करून सोडतात. अखेरीस शेतमालकाला पटवून सौदा पक्का केला जातो आणि जमिनीची विक्री होते. यामध्ये दलाल दोन्हींकडून दलाली पदरात पाडून घेतात. दलालीत रग्गड पैसा मिळू लागल्यावर कोणाची जमीन द्यायची याचा शोध घेऊन त्याची परस्पर किंमत ठरवून बाहेर चढ्या दराने विकण्याचा फंदा दलालांनी शोधला आहे.

Web Title: Possession of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.