वळीवडेच्या सुर्वे बंधाऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:34+5:302020-12-24T04:21:34+5:30
गांधीनगर : वळीवडेसह आसपासच्या अनेक गावांची तहान भागवत शेतशिवार समृध्द करणाऱ्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधाऱ्याची सध्या दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्यावरील ...

वळीवडेच्या सुर्वे बंधाऱ्याची दुरवस्था
गांधीनगर : वळीवडेसह आसपासच्या अनेक गावांची तहान भागवत शेतशिवार समृध्द करणाऱ्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधाऱ्याची सध्या दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असून त्यावरील संरक्षक कठड्याची पडझड झाल्याने हा बंधारा असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे वळीवडे, हालोंडी, हेरले, शिरोली गावचे शिवार हिरवेगार व समृद्ध झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. या बंधार्यावरून नदीपलीकडील वळीवडे ते हेरले, हालोंडी, शिरोली या गावांच्या हद्दीत शेतकऱ्यांची शेती आहे. ती कसण्यासाठी व इतर कामासाठी या बंधाऱ्यावरुनच जावे लागते. मात्र, बंधाऱ्यावरील रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत. बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रिट पुराच्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना बंधाऱ्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकवेळा बंधार्यावरून ये-जा करत असताना दुर्घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या बंधार्याची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. बंधाऱ्याचे भवितव्य टिकविण्यासाठी पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यावर योग्य त्या उपाययोजना करून तो सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट 1) वळीवडेसह इतर गावांसाठी दुवा असणारा सुर्वे बंधारा हा ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व शेती सिंचनासाठी बांधण्यात आला. संबंधित पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याची पाहणी करून तो मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत याकामी योग्य तो पाठपुरावा प्रशासनाकडे करून बंधाऱ्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रयत्न करू.
- सरपंच - अनिल पंढरे
चौकट 2)
छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून सुर्वे बंधाऱ्याची उभारणी केली. अनेक गावांची तहान भागवत असलेल्या व समृद्ध शेतीसाठी योगदान देणाऱ्या या बंधाऱ्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने या बंधाऱ्याकडे लक्ष देऊन त्याची सुरक्षितता जपावी.
- ग्रा.पं. सदस्य - भगवान पळसे.
चौकट 3)
सुर्वे बंधाऱ्याबाबत पाणी पातळी वा सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी ऑफिसकडे आलेल्या नाहीत. पण बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत तक्रारी असतील, तर योग्य तो सर्व्हे करून ताबडतोब दुरुस्तीसाठी प्रयत्न करू.
- शाखा अभियंता पाटबंधारे विभाग - उत्तम मोहिते.
फोटो ओळ-
वळीवडे येथील सुर्वे बंधाऱ्याची झालेली दुरवस्था व जीवघेणी वाहतूक. (छाया : बाबासाहेब नेर्ले.)