Kolhapur: सकाळी प्राध्यापक, संध्याकाळी वेटर; सीएचबीधारक प्राध्यापकांची अवस्था 

By पोपट केशव पवार | Updated: December 25, 2024 17:03 IST2024-12-25T17:03:03+5:302024-12-25T17:03:27+5:30

सरकारने नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणामध्ये लागू केले खरे, मात्र, ते शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. वर्षानुवर्षे रखडलेली प्राध्यापक भरती, ...

Poor condition of CHB professors due to stalled recruitment, insufficient remuneration | Kolhapur: सकाळी प्राध्यापक, संध्याकाळी वेटर; सीएचबीधारक प्राध्यापकांची अवस्था 

Kolhapur: सकाळी प्राध्यापक, संध्याकाळी वेटर; सीएचबीधारक प्राध्यापकांची अवस्था 

सरकारने नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणामध्ये लागू केले खरे, मात्र, ते शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. वर्षानुवर्षे रखडलेली प्राध्यापक भरती, पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसलेल्या जागा, यामुळे शिक्षणाची ही सारी मदार सीएचबीधारकांवर आली आहे. शिवाजी विद्यापीठातील ७० टक्क्यांहून अधिक महाविद्यालये सीएचबीधारक प्राध्यापकांवरच सुरू आहेत. यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका सुरू करत आहोत.

पोपट पवार

कोल्हापूर : हातात पीएच.डी, सेट-नेटसह डझनभर पदव्या, मी अमूक-तमूक कॉलेजला प्राध्यापक आहे, हे सांगायला एक छोटीशी नोकरीही. पण, दुपारी वर्गात ज्ञानदान करणारा हाच प्राध्यापक संध्याकाळी मात्र हॉटेलमध्ये वेटर, रस्त्यावर भाजीविक्रेत्याच्या भूमिका निभावत असल्याचे विदारक चित्र सध्या सीएचबी प्राध्यापकांबाबतीत अनुभवयाला मिळत आहे. वर्षानुवर्षे रखडलेली प्राध्यापक भरती, अपुरे मानधन यामुळे सीएचबीधारकांना हे ‘फुकाचे प्राध्यापकी जिणे’ नको नकोसे झाले आहे.

सध्या राज्यात विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. २०१८ मध्ये राज्य सरकारने २०८८ जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली. मात्र, यातील बहुतांश जागा अद्यापही भरलेल्या नाहीत. विद्यापीठ अधिविभागातील भरतीला तब्बल दहा-बारा वर्षांनंतर यंदा मुहूर्त लागला. मात्र, त्याही भरतीला कुलपतींनी स्थगिती दिल्याने पात्रताधारकांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.

शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १८०० हून अधिक सीएचबीधारक तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. वाढते वय, अपुरे वेतन व नोकरीची हमी नसल्याने या सीएचबीधारक प्राध्यापकांना कॉलेजव्यतिरिक्त दुपारी, सायंकाळी छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही अनेक सीएचबीधारक प्राध्यापक वेटर, गवंडीकाम, भाजीपाला विकण्याचे काम करतात.

सालगड्यापेक्षाही कमी मानधन

सरकार पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची भरती वर्षानुवर्षे काढत नाही. महाविद्यालयांमध्ये ज्या भरती गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी सुरू केल्या, तेथील जागा अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. सीएचबीच्या प्राध्यापकांना वेळेत आणि समान कामास समान वेतन दिले जात नाही. सालगड्यापेक्षाही कमी मानधन दिले जात असल्याने या प्राध्यापकांना छोटी-मोठी कामे करण्याची वेळ आली आहे.

वय निघून गेले तरी..

मुलगा चांगला शिकला, डॉक्टरेट मिळवली. त्यामुळे त्याला चांगली नोकरी लागेल, या कुटुंबाच्या अपेक्षेंचे मोठे ओझे घेऊन जगणाऱ्या सीएचबीधारकांची सरकारनेच कुचेष्ठा केली आहे. हजारो जागा रिक्त असताना त्या भरल्याच जात नसल्याने या प्राध्यापकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. चांगले शिक्षण घेऊनही योग्य वयात नोकरी मिळत नसल्याने या तरुण प्राध्यापकांचे विवाह जमणेही मुश्कील झाले आहे. प्राध्यापक भरती निघाली की त्यात संधी मिळेल, ही अपेक्षा ठेवून जगणाऱ्यांची अनेक उमेदीची वर्षे निघून गेली. मात्र, त्यांना पूर्णवेळ प्राध्यापकाची संधी मिळालेली नाही.

दृष्टीक्षेपात प्राध्यापक
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सीएचबीधारक : १८००

Web Title: Poor condition of CHB professors due to stalled recruitment, insufficient remuneration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.