पंधरा साखर कारखान्यांवर ‘प्रदूषण’ची नजर
By Admin | Updated: December 24, 2015 00:31 IST2015-12-24T00:19:14+5:302015-12-24T00:31:42+5:30
स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा : दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील सहा कारखान्यांवर कारवाईच्या हालचाली

पंधरा साखर कारखान्यांवर ‘प्रदूषण’ची नजर
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांत प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी आॅनलाईन स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा (मॉनिटरिंग सिस्टीम) कार्यान्वित केली आहे. यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही ही यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या सहा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत.पंचगंगा नदीकाठावर आठ साखर कारखाने आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ते पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे स्पष्टही झाले आहे. काही कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याचेही यापूर्वी पुढे आले आहे. परिणामी कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी अनेक वेळा केली. मात्र ठोस उपाययोजना न केल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीत न्यायालयाने ‘महसूल’च्या पुणे विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीकडून उपाययोजनांचाच एक भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व २१ साखर कारखान्यांना प्रदूषणासंबंधीची आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची सूचना दिली. हंगाम सुरू करण्यापूर्वीच ही यंत्रणा बसवावी, असे लेखी कळविले. त्यानुसार पंधरा साखर कारखान्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कारखान्याच्या प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेबसाईटवर पाहता येत आहे. परिणामी प्रदूषणाला चाप बसण्यास मदत होत आहे.
यंत्रणा काय आहे ?
प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर संबंधित कारखाना स्थळावर जाईपर्यंत पुरावा मिळत नसे. म्हणून आॅनलाईन मॉनिटरिंगद्वारे हवा, पाणी यांच्या प्रदूषणावर नजर ठेवली जात आहे. या यंत्रणेची किंमत बारा लाख आहे. टॉवर आणि सेन्सरद्वारे हवा आणि कॅमेऱ्याद्वारे कारखान्यातून किती दूषित पाणी बाहेर पडते, त्यावर काय प्रक्रिया केली यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे प्रदूषणासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळणार आहे.
प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी पंधरा साखर कारखान्यांनी आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा सर्वच कारखान्यांनी बसवावी, अशी सूचना दिली आहे. यंत्रणा न बसविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येईल.
- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
तीन कारखान्यांचे दुर्लक्ष...
गडहिंग्लज, तात्यासाहेब कोरे (वारणानगर), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) या कारखान्यांनी ही यंत्रणा बसविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. न बसविल्यास या कारखान्यांवर कारवाई होऊ शकते. उदयसिंग गायकवाड (शाहूवाडी), मंंडलिक (हमीदवाडा), भोगावती या कारखान्यांनी यंत्रणा बसविली आहे; पण कार्यान्वित केलेली नाही. कुंभी-कासारी, शाहू, गुरुदत्त, हेमरस, शरद, पंचगंगा, दत्त, आजरा, दालमिया, इको केन, डी. वाय. पाटील, सेनापती घोरपडे, महाडिक शुगर्स, जवाहर, राजाराम या कारखान्यांनी यंत्रणा बसवून कार्यान्वित केली आहे.