अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:57 IST2025-06-24T20:54:38+5:302025-06-24T20:57:35+5:30

Ahmedabad plane crash : एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात किती लोकांचा बळी गेला, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

How many people died in the Ahmedabad plane crash? Government releases official figures | अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने आज प्रथमच अधिकृतपणे दिली. १२ जून रोजी लंडनला जाणारे हे विमान कोसळल्यापासून एकूण मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. डीएनए चाचणीनंतरच हा आकडा निश्चित करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

२६० मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण!

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, २६० मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे, तर सहा मृतदेहांची चेहऱ्यावरून ओळख पटली आहे. मृतांमध्ये १२० पुरुष, १२४ महिला आणि १६ मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत २५६ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत, तर उर्वरित मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

लंडनकडे जाणारे हे बोइंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले. ते थेट विमानतळाच्या अगदी बाहेर असलेल्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या निवासी कॅम्पसमध्ये पडले. विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी केवळ एक ब्रिटिश-भारतीय व्यक्ती ,जो ११ए सीटवर बसला होता तो बचावला होता.

ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानातील ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे. ब्लॅक बॉक्स खराब झाल्याने तो डेटा काढण्यासाठी परदेशात पाठवला जाऊ शकतो, अशा माध्यमांतील वृत्तांबद्दल विचारले असता, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी याला केवळ एक 'अटकळ' म्हटले. "ब्लॅक बॉक्स भारतातच आहे आणि सध्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) त्याची तपासणी करत आहे," असे ते म्हणाले.

या अपघातानंतर एअर इंडियाने अनेक सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाइड-बॉडी विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहतील.

Web Title: How many people died in the Ahmedabad plane crash? Government releases official figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.