सतेज यांच्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:38 IST2019-04-12T00:38:50+5:302019-04-12T00:38:56+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार लाभली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार ...

सतेज यांच्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार लाभली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी घेतलेल्या थेट महाडिक विरोधी भूमिकेस जिल्ह्यांतील किती प्रमुख नेत्यांचे पाठबळ आहे याची रंगीत तालीमच वाढदिवसाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. त्यामुळेच कसबा बावड्यात वाढदिवसाच्या कमानीवरील शुभेच्छांची जागा ‘आमचं ठरलंय..’ या त्यांच्या टॅगलाईनने घेतली आहे.
गेल्या महिन्याभरापासून आमदार पाटील यांनी कोल्हापूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. स्वत: उमेदवार असल्याप्रमाणेच ते सभा, व्यक्तिगत गाठीभेटी, जोडण्या लावण्यात व्यस्त आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार सुरू केल्यावर त्याची हवा तयार झाली आहे. शिवसेना-भाजप जेवढी महाडिक यांच्यावर टीका करत नाहीत तेवढी प्रखर टीका आमदार पाटील हे करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ‘गुलाल हीच वाढदिवसाची भेट!’ अशा स्वरूपातील संदेश सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक आणि ग्रुपच्या व्हॉट्स अॅपचा डीपी आणि फेसबुक प्रोफाईल ‘आमचं ठरलंय’ झळकत आहे. वाढदिवसानिमित्त वह्या संकलन, रक्तदान शिबिर, बालकल्याण संकुलातील मुला-मुलींना गणवेश वाटप, क्रिकेट आणि हॉकी स्पर्धा, असे उपक्रम राबवले जाणार आहेत.