राजकीय बीजगणित--
By Admin | Updated: January 20, 2017 01:11 IST2017-01-20T01:11:50+5:302017-01-20T01:11:50+5:30
फुल्ल बाजा

राजकीय बीजगणित--
झेडपीच्या इलेक्शनची आचारसंहिता लागल्या पास्नं प्रचारसंहिता कशी असावी, हे ठरिवनारी इचारसंहिता जोमानं कामाला लागलीया. आधीच्या सभागृहातल्या काही अभ्यासू सदश्यांनी मुदत संपत आलीया म्हटल्यावर तातडीनं अभ्यासदौऱ्याचं नियोजन ही केल्तं. पन ते बहुतेक मंजुरी न मिळाल्यानं इस्कटल्यालं दिसतयं. चांगल्या गोष्टीला उगाचच खोडा बसला ना राव! हल्ली एवढे अभ्यासू आनि तळमळीचे विद्यार्थी कुठं मिळत्यात का सांगा? मस्त उटी, शिमला, कुलू मनाली न्हाईतर बजेटनुसार थायलंड, मलेशिया अशा विशेष अभ्यास सहलीचं आयोजन झालं असतं. त्याच त्या विकासयोजना रोज रोज राबवून कंटाळलेल्या सदश्यांना तिकडल्या नवनवीन योजनांची आयडिया आली असती.
आता अशा जनतेच्या हिताच्या चांगल्या उपक्रमांना लै जनं बजेट आनि नाना कारनं सांगून खो घालत्यात. काय तर म्हनं टर्म सपल्यावर आत्ताच ऐनवेळी ही उधळपट्टी सुचली का? अवो, मला सांगा हल्लीचे विद्यार्थीबी अनेक विषयांचा वर्षभर कुठं अभ्यास करत्यात? परीक्षा तोंडावर आली की मग अभ्यासाला बसायची पद्धतच हाय की आपल्याकडं!
बाकी असल्या अभ्यासदौऱ्यांच्या नंतर सदश्यांची परीक्षा घेन्याची आयडियाबी काय वाईट न्हाई. दौऱ्यात कोंच्या कोंच्या स्थळांना भेटी दिल्या? तिथं नवीन काय काय शिकलात? तिकडला शिलॅबस आपल्याकडं कसा राबवता यिल? वगैरे.. अशा प्रश्नांवर सदश्यांची अभ्यासपूर्ण उत्तरं वाचून जनतेचंबी समाधान हुईल. आनि इरोधकबी गप्प हुतील. असो.
तर आता मागलं समदं इसरून झेडपीच्या फुडल्या सभागृहाच्या जुळनीत समदी लागल्यात. त्यामुळं अभ्यासाचा एकूणच विषय हार्ड झालाय. आत्तापात्तूर कसं हुइत हुतं... पारंपारिक पद्धतीनं इच्छुक कार्यकर्ते आनि नेतेमंडळी कामाला लागायचीत. एकाच पक्षातल्या दोन इरोधी गटांमध्ये सामंजस्य घडविन्यासाठी ‘साम आनि दाम’ ही दोन नामी हत्यारं बास व्हायची. कवाकवा अगदी क्वचित ठिकानी हार्डकोर कार्यकर्ते ‘दंड’ थोपटून राडा करायचीत. पन ह्या इलेक्शनला पेपर गणिताचा लागलाय. राज्यभर जाहीर झाल्याला निकालाचा ट्रेंड बघून भल्याभल्यांची झोप उडाली. तेच्यातच भर म्हणून ह्या मंडळींना सुखानं झोप लागावी म्हनून ‘भेद’ भाव न बाळगता दादांनी स्वागतकक्ष उभारला. पन ज्यांच्याशी आत्तापात्तूर तत्वानं भांडत आलोय तेंनी कमलपुष्पानं बिछाना सजवला तरी कट्टर कार्यकर्त्यांची समजूत कशी काढायची ह्या विचारानं पुन्हा काहींच्या झोपेचं खोबरं झालं. जेंच्याकडं आधीच ‘खोबरं’ हुतं तेंनी मात्र आधीच्या मित्रांच्या हातात वेळीच ‘नारळ’ ठेवला आनि मुठीत ‘कमळ’ पकडलं.
काही नेत्यांची मोठीच गोची झालीया. काहींची तर ‘एकिकडं अस्तित्त्वाची लढाई आनि दुसरीकडं महत्त्वाचा कार्यकर्ता उडी मारायच्या तयारीत’ अशी पंचाईत झालीया. ‘कमळ’ धरावं तर आपनच आधी केलेल्या तत्वाच्या चिखलात हात बरबटतोय, ‘घड्याळ’ घालावं उडी मारायचं टायमिंग बरोबर यिल हेची ग्यारंटी न्हाई आनि ‘धनुष्य’ पेलायचं म्हटलं तर आता युतीच्या गणिताचा पेपर काय साध्या गणिताचा न्हाई, तिथं आता बीगणितासंगट भूमितीबी हाय. कोंच्या तालुक्यात कोन कुनासंगट युती करनार आनि कुनाची कुनासंगट आघाडी असनार ही भूमितीचा पेपर सेटिंग करनाऱ्या मोठ्या नेत्यांनाबी उमगना झालीया. शेवटी ‘निवडून आल्याल्या आकड्यांशी मतलब म्हनून सोडून द्यावं’ तरीबी पंचाईत आनि ‘न्हाई सोडलं तर पेपर अवघड’! त्यात जिल्ह्यापुरतं बोलायचं तर दादांनी अशी फिल्डिंग लावलीया की बरोब्बर गल्लीतच कॅच उडतोय. एकाला धरलं तर दुसरा चावतोय आनि सोडलं तर त्यो दुसऱ्या पक्षात पळतोय अशी गत हाय. झेडपीच्या यंदाच्या पेपरानं मातब्बर नेत्यांची मती गुंग झालीया तिथं कार्यकर्त्यांची काय कथा! असो, आपून आपलं बगत ऱ्हायचं. मग ती ‘संगीत खुर्ची’ असूंदे न्हाईतर (दोरीवरल्या) ‘उड्या’!
भरत दैनी--(भरत दैनी प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या
लघुनाटिका, चित्रपटासाठी पटकथा लिहिल्या आहेत.)