अक्षयकुमारकडून पोलीस कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:36 IST2017-10-22T04:35:06+5:302017-10-22T04:36:21+5:30
अभिनेता अक्षयकुमार यांनी १०३ शहीद पोलीस कर्मचा-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे.

अक्षयकुमारकडून पोलीस कुटुंबीयांना मदत
कोल्हापूर : अभिनेता अक्षयकुमार यांनी १०३ शहीद पोलीस कर्मचा-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे. यापैकी ३९ धनादेशांचे वितरण कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी प्रातिनिधिक स्वरूपात दोघा कुटुंबीयांना हे धनादेश देण्यात आले.
कसबा बावडा येथील करवीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे दिलीप संकपाळ (वय ४९), तसेच सुरेश विठ्ठल जाधव (४४) यांचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने निधन झाले. या दोघांच्या कुटुंबीयांच्या घरी पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन धनादेश आणि मठाई दिली. अक्षयकुमार यांनी स्वाक्षरीने पाठविलेले पत्रही पाटील यांनी वाचून दाखविले. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते.
>अक्षयकुमारचे भावनिक पत्र
आपल्या घरातील शूर शहीद वीरांचे देशासाठी बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्रांचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र, यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती.