पोलीसच बनले नकली ग्राहक
By Admin | Updated: February 23, 2015 23:55 IST2015-02-23T23:50:16+5:302015-02-23T23:55:33+5:30
कातडी विक्रीचा पर्दाफाश : अरुण कदमने घेतले पावशीतून वाघाचे कातडे

पोलीसच बनले नकली ग्राहक
सावंतवाडी : कलंबिस्तच्या ग्रामसेवकाने आजऱ्यात वाघाच्या कातड्यासाठी शोधलेले गिऱ्हाईक फुटल्याने कातडे विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला. वाघाच्या कातड्यासाठी पोलीसच ग्राहक बनले आणि संशयितांना जेरबंद केले. याप्रकरणी आजरा पोलीस कुडाळ पावशी येथील एका व्यक्तीच्या शोधात असून, त्यानेच हे कातडे शिवापूर येथील अरुण कदम यांच्याकडे दिल्याचे पोलिसांच्या तपासांत उघड झाले आहे.कलंबिस्तमधील तिघांसह शिवापूर येथील एकाला आजरा पोलिसांनी रविवारी पट्टेरी वाघाचे कातडे विकताना रंगेहात पकडले. चार महिन्यांपूर्वीच पोलिसांनी सांगेली कलंबिस्त येथील तिघांना बिबट्याच्या कातडीप्रकरणी अटक केली होती.तेव्हापासून हा परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तसेच वन्य प्राण्यांची हत्या होत असून, वनविभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शिवापूर येथील अरुण कदम याने पावशी येथील एका व्यक्तीकडून काही वर्षांपूर्वी हे कातडे घेतले होते. कदम यांची ओळख कलंबिस्त येथील किरण सावंत या युवकाशी झाली. त्याने कातड्याबद्दल कलंबिस्तचे ग्रामसेवक प्रल्हाद पाटील याला सांगितले आणि कट शिजला. मूळ साळगाव (ता. आजरा) येथील ग्रामसेवक पाटील यांनी आपल्याकडे ग्राहक असल्याचे सांगत मध्यस्थ म्हणून सुलगाव येथील एका युवकाला हाताशी धरले. गेले चार दिवस हे कातडे विकण्याचा घाट घातला जात होता. ठरल्याप्रमाणे रविवारी किरण सावंत याने आपल्या इनोव्हा कारमधून कातड्यासह गावातीलच अशोक राऊळ व पुंडलिक कदम या दोघांना घेतले आणि सकाळी आजरा येथे जाण्यास निघाले. आजरा येथे पोहोचल्यानंतर ग्रामसेवक पाटील व त्याचा साथीदार बाळकृष्ण देऊलकर याच्यासोबत आजरा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले.याची कुणकुण लागल्याने सुलगाव येथील युवकाने पोलिसांना अलर्ट केले होते. आजरा पोलीस स्वत:च याप्रकरणी नकली ग्राहक बनले आणि आजरा येथील हॉटेलमध्ये दबा धरून बसले. किरण सावंतसह चारजण इनोव्हाने हॉटेलमध्ये दाखल झाले. पाठोपाठ प्रल्हाद पाटील व बाळकृष्ण देऊलकर तेथे आले आणि त्यांच्यात कातड्याच्या देवाण-घेवाणीची चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले.
शिकारी मोकाट, वनविभाग कोमात
महाराष्ट्रात पट्टेरी वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे. नव्या गणनेनुसार सिंधुदुर्गमध्ये दोन पट्टेरी वाघ आहेत आणि अशातच पट्टेरी वाघाची हत्या होत राहिली तर एक दिवस देशातील पट्टेरी वाघच संपून जातील. तसेच सह्याद्रीच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात शिकारी होतात आणि हे शिकारीही मोकाट सुटले आहेत; मात्र वनविभाग गप्प असून, अधिकारी कोमात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. (प्रतिनिधी)
आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
आजरा येथे रविवारी पकडण्यात आलेल्या वाघाच्या कातड्याच्या विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, यातील सहा आरोपींना आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता सर्वांना गुरुवार (दि. २६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये किरण सखाराम सावंत (वय ३७, रा. कलंबिस्त, गणेशवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), अशोक वासुदेव राऊळ (५४, रा. कलंबिस्त दुर्गवाडी, ता. सावंतवाडी) व ग्रामसेवक प्रल्हाद बाळासाहेब पाटील (मूळ गाव साळगाव, ता. आजरा) यांच्यासह अरुण महादेव कदम (रा. शिवापूर, ता. कुडाळ), पुंडलिक तुकाराम कदम (रा. वेरले, ता. सावंतवाडी) व बाळकृष्ण सदाशिव देवलकर (३८, रा. साळगाव, ता. आजरा) यांचा समावेश आहे.
अहवाल येताच ग्रामसेवकाचे निलंबन
या प्रकरणात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात येणार आहे. पोलिसांनी आपला अहवाल आम्हाला देताच पाटील यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद महाजन यांनी दिली.