मैदान की पार्किंगसाठी ‘खेळ’ मांडला!
By Admin | Updated: April 8, 2015 00:27 IST2015-04-07T23:50:22+5:302015-04-08T00:27:20+5:30
शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर : स्थलांतर रद्द झाल्यास राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेच्या मैदानाचा सदुपयोग होणार का ?

मैदान की पार्किंगसाठी ‘खेळ’ मांडला!
संतोष पाटील -कोल्हापूर -शहर वाहतूक पोलिस शाखेचे कार्यालय राजारामपुरीतील शाळा क्रमांक नऊ येथील जागेवर स्थलांतरास शाळा व मैदान बचाव कृती समितीने तीव्र विरोध केल्याने हा मुद्दा वादाचा तसेच स्फोटक बनत आहे. वास्तविक राजारामपुरी व परिसरात एकही प्रशस्त मैदान नसल्याने कृती समितीची मागणी रास्त असली, तरी शाळेच्या मैदानाचा सध्याचा वापर हा ‘ओपन बार’ व ट्रक पार्किंगसह घरगुती गॅसवाटपाचे केंद्र यासाठीच केला जात होता हे वास्तव आहे. त्यामुळेच महापालिकेने येथील तीन खोल्या वाहतूक शाखेच्या नूतन कार्यालयासाठी दिल्या. यानंतर मात्र, खेळाच्या मैदानासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशासनावर तुटून पडले. या आंदोलनाच्या रेट्याने जर वाहतूक शाखेला दुसरी जागा प्रस्तावित केल्यास खरच शाळा व मैदानासाठीच या जागेचा वापर होणार का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
ठरवून विरोध असेल तर ‘तीच’ जागा घेणार
पोलीस अधीक्षक : कृती समितीच्या शिष्टमंडळास दिला इशारा; काम सुरू असताना का विरोध केला नाही ?
कोल्हापूर : राजारामपुरीतील शाळा क्रमांक नऊ येथे शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरित करू नका, अशी विनंती मंगळवारी शाळा व मैदान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांना केली. यावेळी शर्मा यांनी शिष्टमंडळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ‘शेवटपर्यंत आमचा विरोध असेल,’ अशी भूमिका स्पष्ट केली. त्यावर संतप्त झालेल्या डॉ. शर्मा यांनी ‘तुम्ही विरोध करायचाच असे ठरवून आला असाल, तर तीच जागा मी घेणार. काय करायचं ते करा,’ असा इशाराच दिला.
कृती समितीने सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे कमलाकर जगदाळे यांनी राजारामपुरीत हे एकमेव मैदान असून, ते मुलांना खेळासाठी वापरले जात आहे. शहर वाहतूक शाखेचे कार्यालय याठिकाणी स्थलांंतरित केल्यास मुलांना खेळापासून वंचित राहावे लागणार आहे. राजारामपुरीतील नागरिकांत असंतोषाची भावना पसरली असून, याठिकाणी कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी हात जोडून विनंती केली. त्यावर डॉ. शर्मा यांनी ‘महापालिकेने आम्हाला जागा दिली आहे. यापूर्वी कार्यालय सुरू करण्यासाठी शाळेतील अंतर्गत कामे सुरू असताना तुम्ही विरोध का केला नाही? त्याचबरोबर मैदानाचा वापर परिसरातील दुकाने व व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी केला जात आहे. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करण्यास लोक बसत असतात, अशा गोष्टींना तुम्ही विरोध केला का? आम्ही कार्यालय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत. तुमचा विरोधच असेल तर आम्हाला दुसरी जागा आणि खर्च केलेले दहा लाख रुपये द्या. तुम्ही यापूर्वीच आला असतात, तर दहा लाख रुपये खर्च करायची गरज नव्हती,’ अशा कडक शब्दांत सुनावले. तुमचा मैदानाला विरोध आहे, इमारतीला नाही, तर मैदान आम्हाला नको. इमारत फक्त वापरासाठी घेत आहे. गाड्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करून घेतो, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
यावेळी नगरसेवक वसंत कोगेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, माजी नगरसेवक अनिल कदम, दिलीप मेत्राणी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवार पेठेतील शाळा घ्या : मेथे
खोलखंडोबा प्रभाग क्रमांक २९ येथील पद्माराजे विद्यालय ही शाळा गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. शाळा परिसरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शाळा अवैध व्यवसायाचे केंद्र बनली आहे. शाळेस मोठे मैदान व प्रशस्त इमारत आहे. ही सर्व जागा व इमारत शहर वाहतूक शाखेस वापरण्यास योग्य आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिक व पोलिसांच्याही सोयीचे ठिकाण आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय येथे आल्याने येथील अवैध घडामोडींना आळा बसेल. नागरिकांनाही यामुळे समाधान मिळणार आहे. त्यामुळे ही जागा वाहतूक शाखेसाठी घ्यावी, असे नगरसेवक निशिकांत मेथे यांनी पत्रकाद्वारे सुचविले आहे.
व्यावसायिक लागेबांधे
येथील राजाराम विद्यालय पाच वर्षांपूर्वीच पटसंख्येअभावी बंद पडले. छत्रपती विजयमाला विद्यालय ही चौथीपर्यंतची शाळाही गेल्या वर्षी विद्यार्थी नसल्याने बंद केली. यानंतर बागल चौकातील उर्दू शाळेस ही जागा देण्यात आली आहे. तरीही शाळेच्या दहा खोल्या व मोठे मैदान पडूनच आहे. मैदानावर माती कमी आणि दगड अधिक अशी अवस्था आहे. याचा वापर परिसरातील दुकाने व व्यावसायिकांकडून पार्किं गसाठी केला जातो. आठवड्यातून दोन दिवस या मैदानावर गॅस वितरणाचे काम सुरू असते. शाळेच्या तीन खोल्या ‘ट्रॅफिक पोलीस’ वापरणार आहेत. या मैदानाशी काहींचे व्यावसायिक लागेबांधेही आहेत. शाळा पोलिसांच्या ताब्यात गेल्यास मैदानाचा मुक्तपणे वापर करता येणार नाही, यासाठी विरोध होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नागरिकांची गैरसोय
वाहतुकीच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना दंडाची रक्कम भरण्यासाठी दररोज तीनशेंहून अधिक वाहनधारक जयंती नाल्यावर येत असतात. आता या सर्व वाहनधारकांना राजारामपुरीत जावे लागेल. कार्यालय शहराच्या एका कोपऱ्यात गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेसाठी महापालिकेने दुसरी आरक्षित जागा द्यावी, जी सर्वांसाठी सोयीची असेल, असाही सूर आहे.
निवडणुकीचे रंग
महापालिकेची निवडणूक येत्या सहा महिन्यांत होत आहे. इच्छुकांना आपसूकच मैदानाचा विषय घेऊन आंदोलनाची संधी मिळाली. त्यामुळे परिसरातील पाच ते सात नगरसेवकही आंदोलनात सहभागी झाले. या नगरसेवक व समाजसेवकांनी या शाळा बंद पडत असताना त्या वाचविण्यासाठी कोणता प्रयत्न केला? मैदानाचा
इतर कारणांसाठी वापर होत असताना मैदान बंदिस्त का केले नाही? वाहतूक शाखेचे
कार्यालय दुसरीकडे नेण्याचा
विचार झाल्यास मैदान व शाळेचे भवितव्य काय? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. पुन्हा मैदानाचा वापर तळिरामांसाठीच होणार असल्याने यातून तोडगा काढण्याची गरज आहे.