महापालिकेसमोर आपचे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:03 IST2021-01-29T17:00:44+5:302021-01-29T17:03:48+5:30
कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन केले. संगणकीय प्रणालीमध्ये बदल ...

महापालिकेसमोर आपचे ढोल बजाओ आंदोलन
कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन केले.
संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करीत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप यावेळी केला.
आम आदमी पार्टीने काही दिवसांपूर्वी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करीत घरफाळा घोटाळ्याचे बाह्य संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी केली होती; परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेसमोर प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले.
घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट झालेच पाहिजे, अशी मागणी केली. बहिरेपणाचा आव आणलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्ष अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, पल्लवी पाटील, आदी उपस्थित होते.
आपची मागणी
- सन २००७ पासून आतापर्यंतच्या घरफाळा वसुलीचे त्रयस्थ विश्वासू संस्थेकडून ऑडिट करा.
- संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) पूर्णतः बदलून नवीन प्रणाली विकसित करा.
- ६५०० मिळकतींचा घरफाळा शून्य दाखविणाऱ्या तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.