‘प्रयत्नांती गु्रप’च्या प्रयत्नांनी फुलताहेत झाडे
By Admin | Updated: March 19, 2016 00:25 IST2016-03-19T00:19:46+5:302016-03-19T00:25:57+5:30
पर्यावरण रक्षणाचे व्रत : अक्षय कॉलनीतील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा ‘अक्षय’ उपक्रम

‘प्रयत्नांती गु्रप’च्या प्रयत्नांनी फुलताहेत झाडे
संतोष तोडकर -- कोल्हापूर--झाडांना देव मानू नका. देवत्व दिल्याने त्यांची स्नानसंध्या, पूजाअर्चा, नैवेद्य अशा गोष्टींत अडवणूक होते. त्यापेक्षा त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करा, असे आवाहन करणाऱ्या अंजली अभ्यंकर यांनी ‘प्रयत्नांती पर्यावरण’ या गु्रपच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा वसा वयाच्या ६३ व्या वर्षीदेखील अविरतपणे सुरू ठेवला आहे. अक्षय कॉलनीतील अनेकांचा हा उपक्रम ‘अक्षय’ राहणारा आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील स्वातंत्र्यसैनिक दामोदर रामनामे यांच्याकडून त्यांना पर्यावरण प्रेमाचे बाळकडू मिळाले. बागेतील फुलझाडांची काळजी तर सर्वजणच घेतात; पण रस्त्यावर वाढलेल्या, महापालिका किंवा अन्य संस्थांंनी लावलेल्या झाडांना वाली कोण? या विचाराने सकाळी फिरायला जाताना वाटेत दिसणाऱ्या रोपांना पाणी घालण्यासाठी त्यांनी घरातूनच पाण्याच्या बाटल्या घेऊन जायला सुरुवात केली. त्यांच्या या कार्याला त्यांचे भाऊ रवींद्र रामनामे व बहीण शुभदा जोशी यांची साथ लाभली. आपल्या उपक्रमाच्या मर्यादा लक्षात घेऊन सकाळी फिरायला येणाऱ्या व्यक्तींना त्या झाडांंना पाणी घालण्यासाठी विनंती करू लागल्या. पाहता-पाहता त्यांच्या मदतीला ६०-७० हात पुढे आले. त्यातूनच ‘प्रयत्नांती पर्यावरण’ ग्रुप तयार झाला. या गु्रपने ३०० ते ४०० वृक्ष जगविले आहेत.
चार वर्षांपूर्वी तपोवन शाळेच्या रस्त्याला २५ झाडे लावली. त्यांना ट्री गार्डही लावले. मधुकर रामाणे, सतीश लोळगे, अशोक रेडेकर यांच्या सहकार्याने हनुमाननगर परिसरात ३५-४० झाडे ट्री गार्डसह लावून जगविली. गेल्या वर्षी न्यू एज्युकेशन सोसायटी परिसरात ३० झाडे लावून ती जोपासण्याचे काम मुलींवर सोपविले. गेल्या तीन वर्षांपासून वटपौर्णिमेच्या आदल्या रविवारी झाडे दत्तक स्वरूपात देऊन ती जोपासण्याची जबाबदारी विविध कुटुंबांकडे सोपविण्याचा उपक्रमही राबविला जात आहे. लग्न, वाढदिवस अशा समारंभप्रसंगी ग्रुपमधील सदस्य झाडांची रोपे भेट म्हणून देतात. मुहूर्तमेढसाठी आंब्याची फांदी न तोडता एखादे रोप लावून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा आग्रह धरला जातो.
यासह कॉलनीतील मुलांना एकत्र करून त्यांनी प्रत्येकाला एक झाड वाटून दिले व त्याला मुलांची नावे दिली. आपल्या नावाचे झाड या भावनेतून मुलेही उत्साहाने त्या झाडांना पाणी घालून जगविण्याच्या उपक्रमात सहभागी झाली.
अभ्यंकर यांनी आतापर्यंत बकुळ, चिंच, बाहावा, कडुनिंब, वड, रेन ट्री, बदाम, गुलमोहर अशा प्रकारचे विविध वृक्ष लावले व जगविले आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांचे पती अविनाश अभ्यंकर यांनीही समर्थ साथ दिली. समाजातील अनेक सामाजिक संस्था, राजकीय व्यक्तींनी त्यांच्या या कामाची दखल घेऊन ट्री गार्डसाठी आर्थिक मदतही केलेली आहे.
अक्षय कॉलनीतील मीनाक्षी भागवत, अलका जाधव, संगीता जाधव, लक्ष्मीबाई कोंडेकर, वनिता साळोखे, रामचंद्र पाटील, पूनम चोपडे, शुभदा जोशी, रूपाली कोंडेकर, आनंदी सोनटक्के, एम. जी. पवार, सतीश दंडी, शरयू डिंगणकर, दीप्ती कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, शांता शेटे, मुळीक दाम्पत्य, विद्या तगारे, सविता रामनामे याही अभ्यंकर यांच्यासोबत रोज सकाळी बाटलीतून पाणी घेऊन झाडे जगवितात.