तुती लागवड, कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना
By Admin | Updated: November 24, 2014 23:58 IST2014-11-24T23:54:08+5:302014-11-24T23:58:20+5:30
रेशीम उद्योगाला चालना : उद्योगवाढीसाठी अनुदानात वाढ

तुती लागवड, कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना
एम. ए. पठाण - कोल्हापूर -रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासनाने तुती लागवड व कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू केल्या आहेत. काही योजनांचे उद्योगास अनुकूल अशा सुधारणा करून त्यामध्ये मिळणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. याद्वारे पूर्वीपेक्षा अधिक लाभ रेशीम शेतकऱ्यांना देण्यासाठी रेशीम संचालनालयाने पावले उचलली आहेत.
रेशीम उद्योगास आवश्यक तुती रोपे, बियाणे यांचा पुरवठा जिल्हा रेशीम कार्यालय करते. तुती लागवड योजनेंतर्गत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका गुंठ्यात तुतीची ५५०० रोपे तयार केल्यास शासनाकडून १०,५०० रुपये अनुदान मिळेल. तुती रोपवाटिका योजनेंतर्गत एक एकर किंवा अर्धा एकर तुती रोपे तयार केल्यास संबंधिताकडून एक रुपयांप्रमाणे रोपे खरेदी करुन त्याला शासनाकडून प्रतिरोप ६५ पैशांप्रमाणे अनुदान मिळणार आहे.
ठिबक सिंचन संच पुरवठा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे. तुती लागवड करुन ठिबक सिंचनाचा संच बसविल्यास एकरी किंमत रक्कम ३०,००० पैकी ७५ टक्के रक्कम म्हणजेच २२,५०० रुपये अनुदान केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मिळणार आहे.
कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू केली आहे. यामध्ये तुती लागवड केल्यानंतर आधुनिक पद्धतीने तुती जोपासना करणे, कीटक संगोपन करणे यासाठी केंद्रीय पुरस्कृत योजनेंतर्गत एकरी रुपये ७०,००० रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. कीटक संगोपनगृहात रॅकची उभारणी केल्यास त्यापैकी ५० टक्के अनुदान मिळू शकते. अशाप्रकारे रेशीम संचालनालयाने काही नव्या योजना व जुन्या आवश्यक योजनाचे अनुदान वाढवून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग अधिक लाभदायी बनविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उद्योगास चालना मिळून रेशीम व्यावसायिकांना आर्थिक सुबत्ता मिळेल.
रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी तुती लागवड योजना, कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या योजनांच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- एम. के. मुल्ला
रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर
किटक संगोपन बांधकाम योजनेंतर्गत एक हजार स्क्वेअर फूट बांधकामास ८२,५०० रुपये अनुदान, तर ८०० स्क्वेअर फूट बांधकामास ८७,५०० रुपये, ६०० स्क्वे. फुटास ६३०० रुपये, तर ३०० स्क्वे. फूट बांधकामास २१,००० रुपये अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तुती लागवड केल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एकरी २०,००० रुपये अनुदान लाभ मिळू शकते.