पोलीस कॉन्स्टेबलना हवी विसाव्यासाठी जागा
By Admin | Updated: December 11, 2014 23:44 IST2014-12-11T23:01:24+5:302014-12-11T23:44:44+5:30
रात्रपाळी अंबाबाई मंदिराबाहेर : महिला कॉन्स्टेबलना अडचणी

पोलीस कॉन्स्टेबलना हवी विसाव्यासाठी जागा
इंदुमती गणेश - कोल्हापूर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी रात्रपाळी करीत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलना सध्या विसाव्यासाठी जागा शोधण्याची वेळ आली आहे. मंदिराच्या फाटकाच्या आत बसून गस्त घालत असलेल्या कॉन्स्टेबलना आता मंदिराबाहेर थांबण्याची सक्ती केल्याने सर्वच कॉन्स्टेबलना भर थंडीत बाहेर बसून राहावे लागत आहे. शिवाय परिसरात भिकारी, वेडे, कुत्री यांचा वावर असल्याने तुलनेने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना येथे थांबून गस्त घालणे जिकिरीचे जात आहे.
अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी काटेकोर नियम लावण्यात आले आहेत. दिवसा मंदिराच्या चारीही दरवाजांवर चार-चार पोलीस कॉन्स्टेबल असतात, तर रात्री तीन कॉन्स्टेबल असतात. मंदिराचे दरवाजे रात्री साडेअकराच्या दरम्यान बंद होतात. रात्रपाळीला असलेले कॉन्स्टेबल मंदिराच्या फाटकाच्या आतच बसून गस्त घालायचे. त्यामुळे सगळेजण आळीपाळीने विश्रांती घेत पहारा द्यायचे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या सर्व कॉन्स्टेबलना मंदिराच्या फाटकाबाहेर बसून पहारा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच कॉन्स्टेबलची मोठी पंचाईत झाली आहे.
रात्रपाळीला महिला कॉन्स्टेबलही असल्याने त्यांनाच अधिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काहीवेळा परिसरात भिकारी, वेडे, कुत्री फिरत असतात. बाहेर कुठेच स्वच्छतागृहाची सोय नाही; त्यामुळे यात्री निवासधारकांना विनंती करावी लागते किंवा पहाटे साडेचार वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यापर्यंत वाट पाहावी लागते. सतत ताटकळत बसून पहारा देताना काही मिनिटांच्या विसाव्यासाठीही आता जागा नसल्याने गेटबाहेरच मच्छरदाणी किंवा सतरंजीची तजवीज करावी लागत आहे. शिवाय रात्री थंडी असल्यानेही सर्वच कॉन्स्टेबलना ही ड्यूटी करणे जिकिरीचे जात आहे. त्यामुळे रात्रपाळीला पूर्वीप्रमाणेच मंदिराच्या आतच राहून सेवा बजावता यावी, अशी विनंती सर्व कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना करणार असल्याचे समजते.
मंदिराच्या आत ड्युटी असल्याने पूर्वी फारसा प्रश्न नव्हता. आता मात्र मध्यरात्रीनंतर फाटकाबाहेर बसून पहारा देणे खरेच अवघड जाते. चित्रविचित्र लोक बाहेर फिरत असतात, कुत्री येतात, स्वच्छतागृहाची कुठेच सोय नाही. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हटलं तर तशी जागाही नाही.
- महिला कॉन्स्टेबल
मंदिराला धोका बाहेरून...
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते म्हणाले, मंदिराच्या आतमध्ये राहून कॉन्स्टेबल बाह्य परिसराची सुरक्षा कशी करणार? कोल्हापुरातच गेल्या काही दिवसांत दोन बॉम्ब सापडले. अशा परिस्थितीत मंदिराची सुरक्षा अधिक कडक करणे क्रमप्राप्त होते. रात्रीच्या वेळी पंढरपूरसह देशभरातील सर्व मंदिरांबाहेरच पोलीस तैनात केले जातात. अंबाबाई मंदिराच्या बाबतीतच आजवर यातून सवलत दिली गेली. ड्युटीवर असताना कॉन्स्टेबलना रिलॅक्स होण्याची मुभा आहे, झोपण्याची नाही. कर्मचाऱ्यांना काही सोयी-सुविधा हव्या असतील तर त्यांनी सूचना करावी. शक्य असेल तर ती व्यवस्था करता येईल.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या फाटकाबाहेर बसून पहारा देण्याचे आदेश आल्याने पोलीस कॉन्स्टेबलना ऐन थंडीत विसाव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मध्यरात्री काढलेले हे छायाचित्र.