पिराचीवाडी, नरंदेला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:00+5:302021-02-16T04:26:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत पिराचीवाडी (ता. कागल) ...

Pirachiwadi, Narande awarded Rs 20 lakh each | पिराचीवाडी, नरंदेला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार

पिराचीवाडी, नरंदेला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत पिराचीवाडी (ता. कागल) आणि नरंदे (ता. हातकणंगले) या ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे. या दोन्ही गावांना प्रत्येकी २० लाख रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (दि. १६) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती सभागृहामध्ये सकाळी १० वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेला दिवंगत ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला होता. लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृध्द ग्राम निर्माण करणे व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये पिराचीवाडी आणि नरंदे ग्रामपंचायतींना १००पैकी समान गुण मिळाल्याने त्यांना जिल्ह्यातून विभागून पहिला क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी केले आहे.

चौकट

तालुक्याला १० लाखांचा पुरस्कार

तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींना १० लाख रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये वेळवट्टी (ता. आजरा), पिपळगाव (ता. भुदरगड), लकिकट्टे (ता. चंदगड), निवडे (ता. गगनबावडा), करंबळी (ता. गडहिंग्लज), मिणचे (ता. हातकणंगले), संभापूर (ता. हातकणंगले), बहिरेश्वर (ता. करवीर), मुगळी (ता. कागल), वेखंडवाडी (ता. पन्हाळा), कुंभारवाडी (ता. राधानगरी), कोतोली (ता. शाहूवाडी), शिवनाकवाडी (ता. शिरोळ) या १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रूपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Pirachiwadi, Narande awarded Rs 20 lakh each