दानातून भौतिक, पारमार्थिक उद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:53 AM2019-04-22T00:53:17+5:302019-04-22T00:53:21+5:30

इंद्रजित देशमुख माउलींनी सांगितलेल्या महत्त्वाच्या दैवी गुणांपैकी दान हा एक विलक्षण गुण आहे. माझ्या मते व्यक्ती, समाज आणि राष्ट्र ...

 Physical, Paranormal salvation from charity | दानातून भौतिक, पारमार्थिक उद्धार

दानातून भौतिक, पारमार्थिक उद्धार

Next

इंद्रजित देशमुख
माउलींनी सांगितलेल्या महत्त्वाच्या दैवी गुणांपैकी दान हा एक विलक्षण गुण आहे. माझ्या मते व्यक्ती, समाज आणि राष्ट्र परिवर्तन हेतूने याची देही याची डोळा, कायिक, वाचिक व मानसिक स्वरूपात करता येण्यासारखी महत्त्वाची क्रिया म्हणजे दान आहे. मानवाच्या भौतिक व पारमार्थिक उद्धारासाठी कारण ठरू शकणारी एक महत्त्वाची क्रिया म्हणजे दान आहे. तसं पाहिलं तर करायला खूप सोपी असणारी ही क्रिया म्हणजे दान आहे. ते वस्तू स्वरूपातच करता येते असे नाही. एखाद्याकडे बघत सहज मंद स्मिताक्ष टाकला तरी त्यातून त्याला जे समाधान मिळते हेसुद्धा खूप मोठे दान ठरू शकते. तसं पाहिलं, तर खरा आनंद वस्तूत नसतो कधी; तो असतो आमच्या अंत:करणातील स्वीकृतीच्या अभिव्यक्तीवर आणि म्हणूनच दान करण्यासाठी वस्तूच असावी असं अजिबात नाही. वस्तू वा वस्तुजन्य माध्यम न वापरताही दान करता येतं. म्हणूनच परोत्कर्षासाठी दानाइतकं सोपं साधन नाही, असं मला वाटतं. याचसाठी आमचे तुकोबाराय सांगतात की, ‘तुका फार। थोडा तरी परउपकार।।’
वास्तविक आमच्या मनात बऱ्याचदा प्रश्न पडतो की, आम्हीच दान का करावं, याचं उत्तर अगदी तुकोबारायांच्या भाषेत द्यायचं झालं तर
‘जेणे हा जीव दिला दान। तयाचे करीन चिंतन।
जगजीवन नारायण। गाईन गुण तयाचे।।’
निसर्गानं माझ्या कोणत्याच योगदानाचा विचार न करता मला चांगलं शरीर दिलं आहे. न मागता मला सगळं मिळालं आहे; म्हणून मीही कशाचं ना कशाचं योगदान देईन व मला मिळालेल्या या अमोल देण्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करीन, हाच उतराईपणाचा भाव मला दानतीची चेतना जोपासायला कारणीभूत ठरू पाहील किंवा भाग पाडेल म्हणूनच दान केलं पाहिजे. मग त्यासाठी आमच्यातील चुकीच्या समजुतीप्रमाणे दानासाठी पैसाच लागतो, असं मात्र अजिबात नाही. पैसा हा दान देण्यात येणाºया घटकांतील अगदी कमी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे निव्वळ पैसा किंवा धन या एकाच गोष्टीभोवती दातृत्वाला न फिरवता निसर्गाने जे आपल्याला विशेषत्वाने व विशेष स्वरूपात दिले आहे, त्याचे मनापासून व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी विनियोजन करणं व ते समरसून करणं, हे दान आणि उच्चकोटीचं दान ठरू शकते. आम्हाला उपजत लाभलेलं शरीर त्याचा दानासाठी कसा वापर करू शकतो, तर गदिमांनी म्हटलेल्या
‘जनसेवेपायी काया झिजवावी।
घाव सोसूनिय मने रिझवावी।।’
या पद्यपंक्तीप्रमाणे आम्हाला मिळालेल्या शरीराचा आमचा वैयक्तिक प्रपंच सांभाळून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी थोडा जरी वापर करता आला तर ते महान दान ठरू शकतं. अगदी सहजगत्या रस्त्यावरून चालत असताना एखाद्या थकलेल्या व्यक्तीला रस्ता पार करायला मदत करणं. एखाद्या बँकेत गेल्यानंतर सहजगत्या आपला आर्थिक व्यवहार जोपासत एखाद्या अशिक्षित व्यक्तीची स्लिप भरून देणं हेही दानच आहे. आमचे गाडगेबाबा गावोगावी जाऊन गावंच्या गावं साफ करायचे व गाव अंतर्बाह्य स्वच्छ करायचे. त्यांच्याकडे दान देण्यासाठी तुम्हाला व मला अपेक्षित असणारे भौतिक संसाधन होतं की नव्हतं, यापेक्षा त्यांनी आपल्या देहाचा जगासाठी यथोचित वापर केला आणि ते संतत्वाला पोहोचले.
गोरगरिबांच्या मुलांनी शिकावं व शहाणं व्हावं, यासाठी कर्मवीर अण्णांनी आपला देह आयुष्यभर झिजविला. पायात पादत्राणं नाही, डोक्यावर शिरस्त्राण नाही, अंगावर चांगला पोशाख नाही, या सगळ्या सामान्य वेषात वावरणाºया आमच्या अण्णांना ‘कर्मवीर’ या उपाधीनं संबोधलं गेलं ते निव्वळ आणि निव्वळ या योगदानामुळेच.
आम्हाला शिबी नावाच्या एका राजाची गोस्ट सांगितली जाते. त्याने म्हणे एका पक्ष्यासाठी स्वत:च्या देहाचा पूर्णपणे त्याग करायचा निर्णय घेतला होता किंवा दानाबद्दलच माउली एके ठिकाणी सांगतात की,
‘ते वाट कृपेची पुसतू। जे दिशाची स्नेहे भरीतू।
जिवातळी अंथरीतू। आपुला जीव।।’
असं योगदान भरीत जगणं आमच्या ठायी असायला हवं. आजच्या घडीला आम्हाला एवढं सगळं पूर्णपणे जमेल व जमावंच असं अजिबात नाही; पण या मोठ्या माणसांच्या मार्गाने चालत असताना ते समुद्र असतील, तर आम्ही थेंबाची भूमिका जरूर निभवावी. ते वसंतातील बहार असतील तर आम्ही पाकळी बनावं, ते ओतप्रोत भरून ओसंडणारा मधुघट असतील तर आम्ही एखाद्याच्या जिभेवर साखरेचा कण विरघळल्यानंतर जी गोडी निर्माण होते तेवढी गोडी निर्माण करावी, दानतीच्या बाबतीत ते अतिसंपन्न असतील तर आम्ही त्या संपन्नतेतील एखादा बिंदू जरूर बनावं. शरीराच्या माध्यमातून देता येण्यासारखं खूप काही आहे. उत्कट इच्छा असेल तर ते करूही शकतो. हे सगळं नाहीच जमलं तर अवयवदान, मरणोत्तर देहदान, असा फुल ना फुलाची पाकळी स्वरूपातील दातृत्वभाव जरूर जोपासू शकतो; ते जोपसण्याचं दातृत्व आपल्या ठायी प्रकट व्हावं एवढीच अपेक्षा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)

Web Title:  Physical, Paranormal salvation from charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.