गडहिंग्लज : अवघ्या २४ वर्षांत १० शाखा आणि ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार केलेल्या रवळनाथ हौसिंग फायनान्सची कामगिरी सहकारी क्षेत्राला मार्गदर्शक आहे, असे गौरवौद्गार उद्योगपती विलासराव बागी यांनी काढले.
रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल संस्थापक एम. एल. चौगुले व नूतन संचालिका मीना रिंगणे यांचा येथील महालक्ष्मी यात्रा समिती व बाळूमामा मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
बागी म्हणाले, चौगुले यांचे अभ्यासू नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभार यामुळेच स्पर्धेच्या काळातही संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
रमेश रिंगणे म्हणाले, सभासदांच्या विश्वासामुळेच स्थापनेपासूनच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संचालकांनीही आपल्या कामातून तो विश्वास अधिक दृढ केला आहे.
रिंगणे म्हणाल्या, संपूर्ण रिंगणे परिवाराच्या प्रोत्साहनामुळेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राबरोबरच सहकारात काम करण्याची संधी मिळाली.
संस्थापक-अध्यक्ष चौगुले म्हणाले, गडहिंग्लजकरांच्या पाठबळामुळेच संस्थेची भरभराट सुरू आहे. यावेळी विठ्ठल भमानगोळ, सुधीर पाटील, जयसिंग पवार, आप्पासाहेब बस्ताडे, जवाहर घुगरे, शिवाजी पाटील, बाळासाहेब सुतार, बाळासाहेब गुरव, शंकर मोहिते, राजशेखर दड्डी, लक्ष्मण कुंभार, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
सीईओ डी. के. मायदेव यांनी स्वागत केले. सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक शिवानंद घुगरे यांनी आभार मानले.
-
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ‘रवळनाथ’चे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले व नूतन संचालिका मीना रिंगणे यांचा सत्कार करताना महालक्ष्मी यात्रा समिती व बाळूमामा ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य.
क्रमांक : १००१२०२१-गड-०६