एचआयव्ही बाधितांचा टक्का घटला
By Admin | Updated: November 30, 2014 23:57 IST2014-11-30T23:35:13+5:302014-11-30T23:57:54+5:30
एड्स रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती मोहिमेला चांगलेच यश

एचआयव्ही बाधितांचा टक्का घटला
संदीप खवळे - कोल्हापूर --कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाने एड्स रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती मोहिमेला चांगलेच यश येत आहे़ एचआयव्ही तपासणी करण्याची संख्या वाढत असून, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमालीची घट होत आहे़ यावर्षी ४४५०७ व्यक्तींनी एचआयव्हीची तपासणी केलेली असून यापैकी ८२० जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे़ हे प्रमाण १़८ टक्के असून २००९ मध्ये हाच आकडा १० टक्क्यांच्या आसपास होता़ गरोदर महिलांमधील हेच प्रमाण सन २००७ च्या तुलनेत ०़४ वरून ०़१ टक्क्यांवर आले आहे़.
देशात १९९२ पासून एड्स नियंत्रणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली़ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका, नगरपालिका रुग्णालयामध्ये एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्रे (आयसीटीसी) येथे एचआयव्हीची मोफत तपासणी तसेच समुपदेशन केले जाते़ एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, संबंधितांच्या जोडीदाराचीही तपासणी केली जाते़ तसेच त्याच्या कुटुंबीयांना योग्य ते मार्गदर्शन करून एच़ आय़ व्ही़ चाचणीचा अहवाल घेऊन ए़ आऱ टी़ सेंटरकडे पाठवले जाते़
या ए़ आऱ टी़ सेंटरमध्ये संबंधित रुग्णाची ए़ आऱ टी़ पूर्वनोंदणी करून त्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाते़ तिथेही या रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात़ तसेच एआरटी ही औषधप्रणाली हयातभर सुरू करावी लागते़ ही औषधप्रणाली सुरू करण्यापूर्वी सी़ डी़ फोर तपासणी आवश्यक असते़ कोल्हापूर जिल्ह्णात सी़ पी़ आऱ हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज व इंदिरा गांधी रुग्णालय, इचलकरंजी येथे ए़ आऱ टी़ सेंटर आहेत़
एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्था
एड्स नियंत्रण कार्यक्रमावर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक हा विभाग कार्यरत असून, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमावर देखरेख केली जाते़ माहिती संवाद, एड्स सप्ताह, युवा सप्ताह, पथनाट्ये, कलापथक, व्याख्याने यांच्या माध्यमातून एचआयव्हीबद्दल जनजागृती होते.
नेटवर्क आॅॅफ कोल्हापूर पीपल्स लिव्हिंग विथ एच़ आय़ व्ही. या संस्थेकडे ‘विहान’ हा प्रकल्प असून एचआयव्हीबाधित लोकांना समाजप्रवाहात आणण्याचे व त्यांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करते़ याशिवाय एचआयव्हीबाधित गरोदर स्त्रियांच्या अपत्यांना एड्स होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात़ तसेच मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्था, युवा ग्रामीण संस्था गारगोटी या संस्थांच्या माध्यमातून जनजागृती होते.