व्यवहार बंद ठेवून कोल्हापूरच्या जनतेने संपात सहभागी व्हावे : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST2020-12-08T04:20:06+5:302020-12-08T04:20:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज, मंगळवारी ...

व्यवहार बंद ठेवून कोल्हापूरच्या जनतेने संपात सहभागी व्हावे : हसन मुश्रीफ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज, मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. कोल्हापूरच्या जनतेने सगळे व्यवहार बंद ठेवून शांततेत संपात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पंजाब व हरियाणातील शेतकरी गेली १२ दिवस थंडीत आंदोलन करत आहेत. कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत ते मागे हटणार नाही. ते शेतकरी एकटे नाहीत, संपूर्ण देश त्यांच्या मागे असल्याचा संदेश देण्यासाठी देशव्यापी संपात सहभागी व्हा, अत्यावश्यक सेवावगळता काहीही सुरू राहणार नाही, वाहतूक पूर्णपणे बंद राहील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशव्यापी संपाला काँग्रेसचा पाठिंबा असून या कायद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहेच, त्याचबरोबर महागाईही वाढणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जनतेने यामध्ये शंभर टक्के सहभागी होऊन शांततेत बंद पाळावा. बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटकपक्ष सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवार यांच्यामुळेच एफआरपीचा कायदा
दिल्ली आंदोलन सुरू आहे मात्र महाराष्ट्रात आंदोलन होत नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस सांगत आहेत. त्यांना सांगणे आहे, उसाला एफआरपीचा कायदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच केला. तूर, कापूस हमीभावाने खरेदी केला जातो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
घराबाहेर काळे झेंडे लावून निषेध नोंदवा
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर काळे झेेंडे लावून निषेध नोंदवा. मोबाईलच्या डीपी ही काळ्या लावा, त्यातून सामान्य माणसाच्या भावना पोहोचू देत, असे आवाहन मंत्री सतेज पाटील यांनी केले.
हे बंद राहणार नाही...
एस. टी. वाहतूक बंद
मालवाहतुकीसह सर्वच्या प्रकारची वाहतूक बंद
शाळा, महाविद्यालयेही बंद
हे राहणार सुरू..
दूध
औषधे
दवाखाने
- राजाराम लोंढे