भाजप-ताराराणीत खासगी सावकारांचा भरणा

By Admin | Updated: October 22, 2015 00:51 IST2015-10-22T00:41:05+5:302015-10-22T00:51:37+5:30

मुश्रीफ यांची टीका : सदर बाजार येथे प्रचारसभा

Payment of private lenders in BJP-Tararani | भाजप-ताराराणीत खासगी सावकारांचा भरणा

भाजप-ताराराणीत खासगी सावकारांचा भरणा

कोल्हापूर : भाजप-ताराराणी महायुतीमध्ये खासगी सावकारी करणारे तसेच क्लबमध्ये पत्ते कुटणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जनता त्यांना कधीही साथ देणार नाही, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. सदर बाजार, सर्किट हाऊस, शाहू कॉलेज या प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत सदर बाजार परिसरासह शहरात केलेल्या विकासकामांमुळे जनता नक्कीच साथ देईल. आगामी काळातही परिसराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहे.
बारा वर्षांच्या कालावधीमध्ये लाखो लोकांची मोफत आॅपरेशन शासनाच्या निधीतून करून दिली आहेत. तुमच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजेश लाटकर यांनी प्रभागातील रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आदी पायाभूत सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देऊन सदर बाजार परिसराचा कायापालट केला असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. प्रा. जयंत पाटील म्हणाले, ताराराणी आघाडीच्या म्होरक्यांना कोल्हापूरची जनता ओळखून आहे. या निवडणुकीत त्यांना जनता जागा दाखवून देईल. राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आघाडीच ‘नंबर वन’ राहील, असा विश्वासही व्यक्त केला. राजेश लाटकर म्हणाले, सदर बाजार, विचारे माळ परिसरातील सर्व प्रश्न महापालिकेत मांडून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्नेहल जाधव, अन्वरबी शेख, सूरमंजिरी लाटकर, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, महंमद पठाण, झाकीर कुरणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Payment of private lenders in BJP-Tararani