चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवार, पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:39 IST2020-06-24T17:37:40+5:302020-06-24T17:39:27+5:30
राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवार, पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या
कोल्हापूर : राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.
राज्यातील जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना ४५ हजार ७८५ कोटींचे कर्जवाटपाचे उदिष्ट आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना केवळ १२ हजार ३१५ कोटींचे वाटप झालेले आहे. जिल्हा बँका कमकुवत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांना ३२ हजार २६१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते, त्यांपैकी ४९०० कोटींचे वाटप या बँकांनी केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने त्यांची खरीप पेरणीची कामे थांबली आहेत.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन लाखांपर्यंतच्या व त्यावरील रकमेच्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळेच त्यांना खरिपाचे कर्ज मिळू शकलेले नाही. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले.
कोल्हापूर जिल्हा बँकेने १५८ टक्के कर्जवाटप केले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनेक शेतकरी कर्ज घेतात, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ इंडियाच्या दारात आम्ही आंदोलन केले. त्यानंतर शेतकऱ्यांची वेदना राज्य सरकारला कळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात गैर काय? मुळात अशा बाबींकडे राज्याचे अनुभवी मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी लक्ष देणे गरजेचे होते, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.