पावनखिंड संग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:48 PM2018-07-12T22:48:44+5:302018-07-12T22:50:31+5:30

पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राज्यभर प्रसिद्ध आहे. सर्वच ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी होत असतात. या मोहिमेत पुणे-मुंबईसह राज्यातील बहुतेक गिर्यारोहक संस्था एक आव्हान म्हणून सहभागी होतात.

Pavankhinde Sangram | पावनखिंड संग्राम

पावनखिंड संग्राम

Next

-डॉ. अमर आडके-
पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राज्यभर प्रसिद्ध आहे. सर्वच ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी होत असतात. या मोहिमेत पुणे-मुंबईसह राज्यातील बहुतेक गिर्यारोहक संस्था एक आव्हान म्हणून सहभागी होतात. दरवर्षी नेमाने या संस्था पन्हाळगडापासून विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत ज्या मार्गाने शिवाजी महाराज वेढ्यातून सुटून विशाळगडाकडे गेले, त्या मार्गाने जाण्याचा अनुभव घेत असतात. या मोहिमेवर हा प्रकाशझोत.

छत्रपती शिवरायांची पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका आणि पावनखिंड रणसंग्राम हे स्वराज्यसंघर्षातील रोमांचकारी पर्व. शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजींचा पराक्रम आणि धारातीर्थी तन, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडच्या पायथ्याचा महाराजांचा घनघोर संग्राम या साऱ्या प्रसंगांची स्फूर्ती आजही महाराष्ट्राच्या मनामनांत जागी आहे. हजारो धारकरी प्रतिवर्षी या मार्गावरून चालत जाऊन या स्वाभिमानी स्मृतींचा जागर करतात. शिवा काशिदांचे हौतात्म्य हा अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान. शिवा काशिदांची ही चिरंतन स्मृती पन्हाळगडाने गेली साडेतीनशे वर्षे त्यांच्या समाधीच्या रूपाने जिवंत ठेवलीय.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी पूर्वेस साधारण एक मैलावर असणाºया नेबापूर या गावचे ते रहिवासी. त्यांचा पिढीजात धंदा ‘नाभिक’ हाच होय. बोलण्यात पटाईत असणारी ही मंडळी मग शिवाजीराजांच्या गुप्तहेर खात्यात रुजू झाली. हा काल साधारण १६५९-६० चा असावा.
दि. २८ डिसेंबर १६५९ रोजी कोल्हापूरनजीक झालेल्या या युद्धात फाजलखान, रुस्तमे-जमानच्या विजापुरी सैन्याचा दारुण पराभव झाला आणि मग दृष्टान्त झाल्याप्रमाणे त्यांना आठवला, ‘सिद्दी जौहर.’ चाळीस हजार सैन्य आणि प्रचंड सामग्रीसह विजापूरहून तो निघाला. त्यावेळी राजे मिरजेचा वेढा तसाच सोडून किल्ले पन्हाळ्यावर आले. तो दिवस होता दि. २ मार्च १६६०, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. मग सुरू झाला एक अजरामर संघर्ष; ज्याचा शेवट पावनखिंड संग्रामाने झाला.
पन्हाळगडाभोवती सिद्दीच्या सैन्याने वेढा घातला. पावसाळ्यात वेढा शिथिल होण्याची आशा होती, ती ही फोल ठरली. त्यातून पन्हाळगडावरून सुटका व विशाळगडी प्रयाण असा धाडसी बेत निश्चित झाला. आषाढ शुद्ध पौर्णिमा दि. १२ जुलै १६६० हा दिवस निश्चित केला.
सदर ई-महालातून निघून ‘राजदिंडी’ दरवाजातून पन्हाळगडाबाहेर पडायचे असे ठरले; कारण या दरवाजातून बाहेर पडल्यावर थेट पूर्वेच्या बाजूचे वारणा खोरे व उत्तरेला मसाई पठार आणि कडे या नैसर्गिक संरक्षणातून झपाट्याने पन्हाळगडापासून दूर जाता येते. तसेच जंगलातील निबिड वाटेमुळे शत्रूला पाठलाग करणे कठीण. योजना काटेकोर ठरविली गेली. दगाफटका झालाच तर शिवाजींचे प्रतिरूप असणाºया शिवा काशिदाची योजना केली होती. शिवा काशीद त्या रात्रीचे राजे बनले.
...आणि तो दिवस उजाडला. आषाढ पौर्णिमेची रात्र. दिवसभर शरणागतीची हूल उठविली होती. सिद्दीकडे निरोप गेला. राजे बिनशर्त शरण येणार आहेत. या अनपेक्षित घडामोडीमुळे वेढ्यात चलबिचल झाली. गाफिलपणा आला आणि नेमकी हीच संधी राजांना साधायची होती.
राजदिंडीतील पालख्या निव्वळ हूल देण्यासाठी होत्या. अरण्य आणि डोंगरवाटेने विशाळगडाकडे पायीच जाणे क्रमप्राप्त होते. एक पालखी झटकन मसाई पठाराच्या दिशेने वळली आणि शिवराय, बाजी, फुलाजीसह विशाळगडाच्या वाटेला लागले. दुसरी पालखी, प्रतिशिवाजी म्हणून शिवा काशीद नेबापूर गावी ‘वाडा’ नावाच्या इमारतीकडे न्यायला सुरुवात केली. सिद्दीला निरोप गेला. ‘शिवाजी सापडला!’ सिद्दी जातीने पायथ्याशी आला. शेजारी त्याचे अनेक सेनानी होते. त्यात फाजलखान, रुस्तुम-ए-जमान हेही होते, त्यांना खात्री पटली की, हा खरा शिवाजी नाही! एकच गडबड उडाली. सिद्दीच्या सेनानीचे घाव शिवा काशिदांवर पडले. राजांचे कपडे अंगात होते, त्यांनी जमिनीला पाठ दाखविली नाही. या वीररत्नाला आषाढ पौर्णिमेच्या म्हणजे १२ जुलै १६६० च्या मध्यरात्रीनंतर केव्हातरी वीरगती प्राप्त झाली.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून पार होताना प्रतिशिवाजी बनून शिवाजी काशीद यांनी पत्करलेले अलौकिक हौतात्म्य, बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंची पावनखिंडीतील प्राणपणाची झुंज आणि स्फूर्तिदायी बलिदान, बांदलांच्या मावळ्यांचा पराक्रम, विशाळगडाचा वेढा तोडण्याचा महाराजांचा पराक्रम ही सारी तर प्रेरणेची
मूर्तिमंत प्रतीके आहेत. म्हणूनच प्रत्येकाला वाटते, एकदा तरी पन्हाळगडावरून निघून विशाळगडापर्यंत जावे.
पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार केवळ रोमांचक नसून अद्वितीय आहे. पन्हाळगडावरून बाहेर पडल्यानंतर जो मार्ग महाराजांनी विशाळगडाकडे जाण्यासाठी निवडला होता, त्यासाठी त्यांनी परिसराच्या भूगोलाचा वापर किती सखोल अभ्यास करून केला होत हे लक्षात येते. पश्चिमेच्या बाजूला सह्याद्रीची उत्तुंग कड्यांची डोंगररांग आणि त्याच्या उतारावरील घनदाट जंगल यामुळे पश्चिमेची बाजू आपोआप सुरक्षित. पूर्वेकडे तीव्र डोंगर उतार, घनदाट झाडी आणि त्याही पलीकडे पन्हाळ्यापासून ठरावीक अंतरापर्यंतच वेढा. त्यामुळे मसाई पठार ओलांडल्यानंतर थेट पांढरेपाण्यापर्यंत सह्याद्रीच्या कड्याचा ढालीसारखा वापर करत घनदाट जंगलाचे नैसर्गिक संरक्षण मिळेल असा हा मार्ग होता. प्रचलित पावनखिंड म्हणूनच जो भाग समजला जातो, ते म्हणजे कासारी नदीचे उगमस्थान आहे. भर पावसाळ्यात तेथून कोणी समशेरी घेऊन उभे राहू शकेल काय? म्हणूनच पावनखिंड म्हणून आज दाखविली जाणारी जागा ही युद्धभूमीचा एक भाग असू शकतो; म्हणूनच पांढरेपाण्यापासून ते कासारीच्या उगमापर्यंतचा सर्वच परिसर ही युद्धभूमी असून या संपूर्ण परिसरालाच ‘पावनखिंड संग्रामभूमी’ म्हणणे अधिक औचित्यपूर्ण ठरेल. बाजी-फुलाजी यांच्यासह असंख्य ज्ञात-अज्ञात बांदल मावळे धारातीर्थी पडले व त्याचे वृत्त महाराजांना विशाळगडावर समजले. बाजी-फुलाजींसह अनेक अज्ञात मावळ्यांचे अंत्यसंस्कार विशाळगडाच्या पाताळदºयांत राजांच्या उपस्थितीत झाले. धन्य तो राजा आणि त्याच्यासाठी लढणारे निष्ठावंत मावळे!
(लेखक : दुर्ग अभ्यासक तसेच राज्य गडसंवर्धन समितीचे सदस्य आहेत.)


 

Web Title: Pavankhinde Sangram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.