पाटील, हिरण्यकेशी संघांची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:25+5:302021-02-05T07:13:25+5:30
कोल्हापूर : मालती पाटील क्रिकेट अकॅडमी (क) ने क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्ट्सचा, तर दुसऱ्या सामन्यांत हिरण्यकेशी फाउंडेशन (गडहिंग्लज) संघाने ...

पाटील, हिरण्यकेशी संघांची सरशी
कोल्हापूर : मालती पाटील क्रिकेट अकॅडमी (क) ने क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्ट्सचा, तर दुसऱ्या सामन्यांत हिरण्यकेशी फाउंडेशन (गडहिंग्लज) संघाने बबन पाटील क्रिकेट अकॅडमीचा पराभव करीत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० क गट क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.
राजाराम काॅलेज मैदानावर गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्ट्सकडून २० षटकांत ८ बाद ११६ धावा केल्या. यात अमन इनामदार ३१, डाॅ. नितीन राऊतने २०, डाॅ. शेखर पोवाळकर १४, डाॅ. विनायक रायकर १४ धावा केल्या. मालती पाटील क्रिकेट संघाकडून साहील भोसले, रोहित माणगावकर यांनी प्रत्येकी दोन, तर कपिल सांगावकर, विनीत बागल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मालती पाटील क्रिकेट संघाने हे आव्हान १८.३ षटकांत ६ बाद १२१ धावा करीत सहज पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केला.
यामध्ये विनायक कोेळेकर नाबाद ५४, अभिषेक निषाद १८ व अभय गवळी १३ धावा करीत विजय मिळवला. क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्ट्स ब कडून डाॅ. नचिकेत कुलकर्णीने ३, डाॅ. नितीन राऊतने २ व डाॅ. विनायक रायकरने १ बळी घेतला.
दुसरा सामना बबन पाटील क्रिकेट अकॅडमी व हिरण्यकेशी फाउंडेशन, गडहिंग्लज यांच्या मध्ये खेळविण्यात आला. या सामन्यात हिरण्यकेशी संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलदांजी करताना बबन पाटील क्रिकेट अकॅडमीने १७.३ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. यामध्ये ऋत्विक वाझे २३, अमन बंडुबले व पृथ्वीराज हजारे प्रत्येकी १४ धावा केल्या. हिरण्यकेशी फाउंडेशनकडून चेतन सावरेने ४, निखिल पाटील व सुनील खावरे यांनी प्रत्येकी २ सागर शिंदेने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना हिरण्यकेशी फाउंडेशनने १०.४ षटकांत ४ बाद ११२ धावा केल्या. यामध्ये सुनील खावरे २९, चेतन सावरे १८, मनीष मांगले १४ सागर शिंदे नाबाद ११ धावा केल्या. बबन पाटील क्रिकेट अकॅडमीकडून विनोद कोळीने २, आयान मुजावर व ऋत्विक वाझे यांनी प्रत्येकी एक बळी घेत हिरण्यकेशीने सहा गडी राखून विजय संपादन केला.