यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:34 PM2024-02-27T13:34:13+5:302024-02-27T13:35:25+5:30

या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली

Patent to Shivaji University for research on liver cancer, Research by Dr. Shankar Hangirgekar | यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील उपचारप्रसंगी केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या अभिनव संशोधनासाठीशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले. डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. रुतीकेश गुरव व अक्षय गुरव यांनी हे संशोधन केले.

यकृताच्या कर्करोगावर इतर सर्वसामान्य पेशींना कोणताही अपाय न करता केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या ‘डायहैड्रोपिरिमिडोन्स’ या सेंद्रिय संयुगांची निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले. या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली. याच्या अहवालात ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात. ते करीत असताना शरीरातील इतर सामान्य पेशींना अपाय करत नाहीत. त्यामुळे ही संयुगे कर्करुग्णावर उपचारांसाठी सुरक्षित असल्याचे आढळून आले. 

यकृताच्या कर्करोगामुळे होणारा पुरुषांचा जागतिक मृत्यूदर अधिक आहे. आतापर्यंत यकृत कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, अँटीबॉडीज् अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित करण्यात आल्या. परंतु, या उपचार पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारादरम्यानच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये काही औषधांचा उपयोग केला जातो, परंतु या औषधांचा इतर सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतो. 

सध्या वापरात असलेली कर्करोगावरील औषधे ही कर्करोगाच्या पेशी व इतर सामान्य पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रुतीकेश गुरव आणि अक्षय गुरव यांनी बारा नवीन ‘डायहैड्रोपिरिमिडोन्स’ सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेमध्ये तयार केली. त्यांची चाचणी ‘एच.इ.पी.जी.-२’ या यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत असणाऱ्या पेशींवर केली. ही संयुगे खूपच निवडकरित्या कर्करोग पेशी नष्ट करतात, असे संशोधनांती आढळले. या संयुगांच्या सदर निवडकतेच्या गुणधर्मामुळेच या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले.

यकृताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी अतिशय नावीन्यपूर्ण संशोधनास पेटंट प्राप्त झाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधनावर पुनश्च एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Web Title: Patent to Shivaji University for research on liver cancer, Research by Dr. Shankar Hangirgekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.