मजुरांच्या भरवशावरच पॅचवर्कचे काम
By Admin | Updated: December 5, 2014 00:24 IST2014-12-05T00:03:29+5:302014-12-05T00:24:28+5:30
हे खड्डे बुजविण्यासाठी गगनबावड्यापर्यंत मुरुमाचा वापर

मजुरांच्या भरवशावरच पॅचवर्कचे काम
प्रकाश पाटील - कोपार्डे -कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे पॅचवर्किंग सुरू आहे. तरीही रस्त्याची खड्ड्यातून मुक्तता झालेली नाही. मुठकेश्वरच्या पश्चिमेपासून लोघे किरवेपर्यंतचा रस्ता पूर्ण खराब झाला असून, यातून प्रवासी व मालवाहतूक करणारी वाहने अगदी जंप घेत मार्गक्रमण करताना दिसतात. हे खड्डे बुजविण्यासाठी गगनबावड्यापर्यंत मुरुमाचा वापर केला आहे.
सध्या डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज ते गगनबावडा रस्त्यावर पॅचवर्किंगच्या कामाची सुरुवात केलेली असून, ज्या खड्ड्यात मुरुम व माती पावसाळ्यात टाकली गेली होती ती मजुरांच्या व जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात येत आहे.
काम अनुभवी व तज्ज्ञ सुपरवाझरच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे; मात्र या कामास ‘लोकमत’ प्रतिनिधींनी भेट दिली असता एकही शासकीय तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित नव्हती. येथील मजुरांना कामाबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
याच मार्गावर असळजजवळ म्हारकीची व्हाळ येथे एक अरुंद मोहरी आहे. या मोहरीला संरक्षक कठडे म्हणून लहान मोठ्या कमकुवत काठ्या लावून संरक्षक कठडा म्हणून वापर करण्याचा अजब प्रकार झाला आहे. येथून पुढे खोकुर्ले येथे रस्त्यामध्ये निम्मा रस्ता उंच, तर निम्मा किमा चार ते सहा इंच खाली, अशी पातळी बिघडलेला आहे.
गेले तीस वर्षांपासून माझे या रस्त्यावर हॉटेल आहे. रात्रीच्या वेळी हा सुरक्षित मार्ग म्हणून आराम बसगाड्यांकडून प्राधान्याने याचा वापर होतो. मार्ग अत्यंत अरुंद तर आहेच, पण खड्डेही काही कमी होत नाहीत. दरवर्षी खर्च खड्ड्यातच जाताना दिसतोय.
- किरण विष्णू पाटील, कळे, हॉटेल चालक
ट्रॅक्टर तळ कोकणात घेऊन नेहमी जातोय. कळेपासून गगनबावड्यापर्यंत पोहोचताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे कंबरडे मोडले आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रयत्न करून रस्त्याला वैभव व दर्जा प्राप्त करून द्यावा.
- प्रकाश बचाराम पाटील, ट्रॅक्टर चालक
नियम धाब्यावर
सर्वसाधारण शासनाच्या नियम व अटीप्रमाणे एक बाय एकच्या खड्ड्यासाठी किमान तीन किलो डांबर वापरण्याचे बंधन आहे. त्याआधी तो खड्डा संपूर्ण मातीमुक्त करावा लागतो; पण कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या कामादरम्यान खड्ड्यातील माती साफ न करताच त्यामध्ये केवळ नाममात्र डांबर टाकून काम सुरू आहे. त्यामुळे हे भरलेले खड्डे पुन्हा उखडून त्या ठिकाणी जो खड्डा निर्माण होतो त्यामुळे तर पुन्हा वाहन चालकांची मोठी कुंचबणा होते.