भुदरगड तालुक्यात सेना विरोधात पक्षाचेच आमदार
By Admin | Updated: February 8, 2017 00:57 IST2017-02-08T00:57:05+5:302017-02-08T00:57:05+5:30
जिल्हा परिषद निवडणूक रणांगण : स्थानिक आघाडी करून रिंगणात

भुदरगड तालुक्यात सेना विरोधात पक्षाचेच आमदार
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव गटाशी आघाडी केल्यामुळे तिथे शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ‘आमदारांच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेचे चिन्हांवरील उमेदवार’ अशी वेगळीच लढत होत आहे.
जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी रात्री या तालुक्यातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आकुर्डेतून प्रवीण देवेकर तर कडगांव जिल्हा परिषदमधून विजेता महादेव मसूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय मडिलगे, पिंपळगांव, पुष्पनगर, आकुर्डे, कूर आणि कडगांव पंचायत समितीसाठी पक्षाने उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून टाकल्यानंतर जिथे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत तिथे चिन्हांवरच उमेदवार उभे केले जावेत, असा आग्रह धरला. त्यानुसार आमदार आबिटकर यांनाही तसे कळविण्यात आले होते; परंतु निवडणुकीत चांगले यश मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर जाधव गटाशी आघाडी करणे आवश्यक असल्याने त्यांनी धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढण्यास असमर्थता दर्शविली. विधानसभा निवडणुकीतही आबिटकर यांना जाधव गटाने चांगली मदत केली होती. (प्रतिनिधी)
पक्षचिन्हच गोठविले...स्थानिक राजकारणाची गरज म्हणून त्यांनी पक्षाचे चिन्ह घेतले नसले तरी त्यामुळे आमदारांनीच पक्षचिन्ह गोठविल्याचे चित्र मात्र पुढे आले आहे.