‘दाखलेबाज शाळां’मुळे पालक संतप्त

By Admin | Updated: August 10, 2015 00:36 IST2015-08-10T00:36:14+5:302015-08-10T00:36:14+5:30

ही सक्ती चुकीची असून, दाखले नसतील तर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भरावी, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Parents are angry because of 'prescriptive schools' | ‘दाखलेबाज शाळां’मुळे पालक संतप्त

‘दाखलेबाज शाळां’मुळे पालक संतप्त

रत्नागिरी : शासनाच्या सरल प्रणालीअंतर्गत शिष्यवृत्ती वा अन्य योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची माहिती सर्व शाळांमधून संकलित केली जात आहे. मात्र, या योजनेची माहिती शिक्षकांना समजली नसल्याने त्यांच्याकडून विध्यार्थी व पालकांकडे बॅँक खाते पुस्तक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड तसेच अन्य दाखल्यांसाठी सक्ती केली जात आहे. या दाखलेबाज शाळांमुळे पालकांची दमछाक होत आहे. ही सक्ती चुकीची असून, दाखले नसतील तर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भरावी, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दप्तराच्या ओझ्याने आधीच विद्यार्थी व पालक त्रस्त असताना त्यांना दाखले आणण्याच्या सक्तीमुळे आपला कामधंदा सोडून ही कागदपत्र जमवण्यातच वेळ घालवावा लागत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शिष्यवृत्ती योजना आहेत. अन्य काही योजनांतूनही विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. खरेतर असे विद्यार्थी किती आहेत, त्यांचीच माहिती घेणे आवश्यक असताना सरसकट सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांमार्फत सर्व शाळांमधून घेतली जात आहे. विद्यार्थ्याचे बॅँक खाते पुस्तक आवश्यक असल्याचे सांगितले गेल्याने गेल्या आठवडाभरात पालकांना खाते पुस्तक सुरू करण्यासाठी बॅँकांमधून रांगा लावाव्या लागल्या. जातीची प्रमाणपत्र सर्वांकडेच काढलेली असतात असे नाही. दाखला काढायचा तर त्यासाठी काही काळ लागतो. तरीही जातीच्या दाखल्यांसाठी सक्ती केली जात आहे. उत्पन्नाच्या दाखल्यांसाठीही सक्ती केली जात असल्याने सेतूमध्ये पालकांच्या रांगा लागत आहेत.
काही शाळांतून शिक्षक योग्यरित्या माहिती भरून घेत आहेत. उत्पन्न किती हे विद्यार्थ्यांच्या माहिती अर्जात नमूद केले तरीही चालते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सेतूमधून आणण्याची आवश्यकता नाही, असेही काही शिक्षकांकडून सांगितले जाते. त्यामुळे खरे कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांनी दाखल्याची सक्ती केल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी (आॅनलाईन) भरून घेतली जात आहे. विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देता येईल, असा त्यामागे उद्देश आहे. मात्र, ही माहिती घेण्याबाबत शिक्षकांना जे प्रशिक्षण देण्यात आले, त्यावेळी दाखल्यांची सक्ती नाही, असेही सांगितले गेले. विद्यार्थ्यांचे बॅँक खातेपुस्तक नसले तर पालकांच्या खात्याचा नंबर चालेल. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला नसला तर वडिलांचा दाखला चालेल. उत्पन्नाचा दाखला नसला तर नुसते अर्जात उत्पन्न किती हे लिहिले तरी चालेल. आधार कार्डचा नुसता नंबरही अर्जात भरला तरी चालेल. तसेच यातील दाखले नसतील तर शाळांकडे असलेल्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याच्या जातीबाबत व अन्य गोष्टींबाबतच्या माहितीवरूनही अर्ज भरता येईल. दाखल्यांसाठी सक्ती नाही, असे शिक्षकांना प्रशिक्षणाच्या वेळी सांगितले गेले आहे.
-एकनाथ आंबोकर,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: Parents are angry because of 'prescriptive schools'