वर्चस्ववादी राजकारणामुळेच पानसरेंचा खून
By Admin | Updated: April 7, 2015 01:17 IST2015-04-06T23:38:24+5:302015-04-07T01:17:52+5:30
भालचंद्र कांगो : ‘पानसरे यांचा खून का झाला?’ पुस्तकाचे सांगलीत प्रकाशन

वर्चस्ववादी राजकारणामुळेच पानसरेंचा खून
सांगली : संपूर्ण जगात सांस्कृतिक दहशतवाद फोफावत असतानाच, भारतात सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तारूढ आहे. संपूर्ण घटनांचा गांभीर्याने विचार केला, तर गोविंदराव पानसरे यांचा खून हा राजकीय वर्चस्ववादातून झाला असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी शनिवारी येथे केला. अॅड. के. डी. शिंदे लिखित ‘कॉ. पानसरे यांचा खून का झाला... ?’ या पुस्तिकेचे प्रकाशन कांगो यांच्याहस्ते करण्यात आले. प्राचार्य विश्वास सायनाकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कांगो म्हणाले की, दाभोलकर आणि पानसरे यांच्या विचाराने अनेकांना प्रेरणा मिळत होती. यामुळेच त्यांना संपविण्यात आले. या खुनामागे कोण आहे? असा प्रश्न जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा काही घटकांचा विचार करावा लागतो. सध्या सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, त्यांची विचारसरणी काय आहे, हे लक्षात घेतले तर, हा राजकीय खून असल्याचेच दिसते. पानसरेंची हत्या उन्मादातून करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी सरकारचे धोरण वर्चस्ववादाचे आहे, तर महात्मा गांधी आणि विवेकानंद यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मानवतावादाचा होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. मोदी सरकार आल्यापासून ज्या विपरित घटना समाजात घडत होत्या, त्याविरोधात पानसरे हे वैचारिक हल्ला करीत होते. हल्लेखोरांनी केवळ पानसरेंवर हल्ला केला नाही, तर समतेच्या लढ्यावर हल्ला करून पुरोगामी विचारसरणीच संपविण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, बहुजन समाजाच्या भावना भडकावून त्यांना आपल्याकडे वळविणे हेच काहींचे काम आहे. याला रोखणे गरजेचे आहे. याकरिता बहुजन समाजाने लिहिते झाले पाहिजे. त्याचा प्रारंभ ‘या’ पुस्तिकेच्या माध्यमातून झाला आहे.
अॅड. के. डी. शिंदे म्हणाले, विचार संपविण्यासाठीच पानसरेंचा खून केला असून, त्यामागील वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठीच पुस्तिकेचे लेखन केले आहे.
प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी, धार्मिक गुलामगिरी लवकर संपविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शंकर पुजारी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल थोरात यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, धनाजी गुरव, अॅड. अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
वैचारिक मंथन
कॉ. पानसरे यांनी ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकावर परिसंवाद ठेवला होता. त्यातून वैचारिक मंथन झाले होते. तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभरात पन्नास ठिकाणी असे परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचे कांगो यांनी सांगितले.