काकांसाठी मुन्नांचे ‘पी.एन.’ यांना साकडे
By Admin | Updated: November 22, 2015 00:37 IST2015-11-22T00:29:20+5:302015-11-22T00:37:14+5:30
काकांची उमेदवारी पुढे दामटली

काकांसाठी मुन्नांचे ‘पी.एन.’ यांना साकडे
कोल्हापूर : विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत राहावे, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची भेट घेऊन केली. आमदार महाडिक स्वत:, पी.एन किंवा प्रकाश आवाडे यांपैकी कुणालाही उमेदवारी द्यावी असे सांगत असताना खासदारांनी मात्र महाडिक यांच्या पाठिशी राहण्याचे आवाहन करुन काकांची उमेदवारी पुढे दामटली आहे.
आतापर्यंतची पक्षनिष्ठा पाहिली, तर आपणच उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याने इतरांचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पी.एन. यांनी सांगितले.
उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्ंिडग लावल्यानंतर इच्छुकांनी स्थानिक पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत. मतदारांबरोबर नेत्यांची संपर्क मोहीम जोरात सुरू आहे. शनिवारी दुपारी खासदार महाडिक यांनी शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बॅँकेत जाऊन पी. एन. यांची भेट घेतली. उमेदवारीसाठी आमदार महाडिक यांच्यासोबत राहावे, अशी विनंती त्यांनी पाटील यांना केली. आमदार महाडिक निवडून येऊ शकतात, त्यामुळे आपण सहकार्य करावे, असेही त्यांनी सूचविले.
आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे उमेदवारीवर आपणच दावेदार असल्याचे पी. एन. यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. पक्षाशी असलेली निष्ठा पाहता पक्षश्रेष्ठी आपणालाच उमेदवारी देतील, त्यामुळे मी इतरांची शिफारस करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पक्षनिष्ठेसाठी पत्करला राजेंचा रोष
दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे व आपले मैत्रीचे खूप चांगले संबंध होते; पण पक्षाने लोकसभेला सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्ष आदेश मानून मंडलिक यांच्या विजयासाठी काम केले. अशा एक नाही तर अनेक निवडणुका आहेत, ज्याठिकाणी व्यक्तिगत राजकारणाची पर्वा न करता पक्षनिष्ठेला महत्त्व दिले. मग त्या निष्ठेचा पक्ष आता जरुर विचार करेल, असे पी. एन. यांनी सांगितले.