कुस्ती जिंकला, पण जगण्यात हरला; अवघ्या २२ वर्षीय पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराने मृत्यू
By तानाजी पोवार | Updated: October 4, 2022 18:13 IST2022-10-04T18:10:49+5:302022-10-04T18:13:08+5:30
दसऱ्यानिमित्त व्हन्नूर (ता. कागल) येथे कुस्ती मैदानात त्याने दोन नंबरची कुस्ती जिंकून वाहवा मिळवली. पण नियतीने घाला घातला.

कुस्ती जिंकला, पण जगण्यात हरला; अवघ्या २२ वर्षीय पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर : कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापुरात कळंबा परिसरातील राष्ट्रकुल कुस्ती संकुल या तालमीत वास्तव्यास असणाऱ्या पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. मारुती हरिदास सुरवसे (वय २२, रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. कुस्ती जिंकून आला; परंतु नियतीने त्याला जीवनाच्या लढाईत मात्र एवढ्या लहान वयात हरवले.
सुमारे ११० किलो वजन असलेला व अवघा २२ वर्षांचा मारुती सुरवसे हा गेल्या पाच महिन्यांपासून पैलवान राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकुल कुस्ती संकुलात सराव करत होता. त्यापूर्वी तो सांगलीत कुस्तीचे धडे गिरवत होता. सोमवारी दसऱ्यानिमित्त व्हन्नूर (ता. कागल) येथे कुस्ती मैदानात त्याने दोन नंबरची कुस्ती जिंकून वाहवा मिळवली. रात्री कोल्हापुरात कुस्ती संकुलात परतल्यानंतर रात्री सव्वादहा वाजता त्याच्या छातीत दुखू लागले.
सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाताना वाटेतच छातीत कळ आल्याने तो दुचाकीवरून रस्त्यावरच पडला. त्याला तातडीने उचलून खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पैलवान मारुतीचे वडील शेती करतात, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
लहानपणापासूनच कुस्तीची आवड
मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीतच करिअर करण्यासाठी त्याला कोल्हापुरात तालमीत कुस्ती सरावासाठी पाठवले. त्याने निळपण (ता. भुदरगड), चिकोडी आदी ठिकाणी कुस्त्या गाजवल्या. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचा भाऊ, चुलते, मामा व इतर नातेवाईक पहाटेच कोल्हापुरात आले. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह वाखरी येथे नेण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी शंकर चौगुले या पैलवानाचा रंकाळा खणीत बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर मारुती याच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली.