पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:02 PM2019-12-31T12:02:59+5:302019-12-31T12:04:30+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे.

Panchayat Samiti Elected as Chairperson: Congress, Shiv Sena have three Chairmen each | पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे

पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे

Next
ठळक मुद्देपंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदेराष्ट्रवादी, स्थानिक आघाड्यांना दोन, तर ‘जनसुराज्य’कडे एक सभापतिपद

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे.

करवीरमध्ये आमदार पी. एन. पाटील गटाच्या अश्विनी धोत्रे, तर उपसभापतिपदी मंत्री सतेज पाटील गटाचे सुनील पोवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. आजरा पंचायत समितीमधील सहापैकी पाच सदस्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असतानाही सुरुवातीला कोणाला संधी, यावरून थोडी ताणाताणी झाली; मात्र चर्चेनंतर उदय पोवार (पेरणोली) यांची सभापतिपदी, तर स्वाभिमानीप्रणीत असलेल्या वर्षा बागडी यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली. याच निवडीवेळी इतरांनाही आगामी काळात पदे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गडहिंग्लजचे सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने स्थानिक ताराराणी आघाडीच्या हत्तरकी गटाच्या रूपाली कांबळे या एकमेव सदस्या या पदाच्या दावेदार होत्या. त्यांची आणि उपसभापतिपदी श्रीया कोणेकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चंदगड पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी आरक्षित पदासाठी पात्र असलेले भाजपचे गोपाळराव पाटील गटाचे अ‍ॅड. अनंत कांबळे यांची, तर उपसभापतिपदी मनीषा शिवनगेकर यांची निवड झाली आहे. आरक्षणामुळे या ठिकाणी कांबळे यांना पर्यायाने भाजपचा सभापती बनला आहे. कागल पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक गटाचे विश्वास कुराडे (चिखली) सभापती झाले असून, राष्ट्रवादीचे दीपक सोनार उपसभापती बनले आहेत.

भुदरगड पंचायत समितीमध्ये आबिटकर गटाच्या म्हणजेच शिवसेनेच्या विद्यमान उपसभापती कीर्ती देसाई यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे, तर सुनील निंबाळकर यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या दीपाली पाटील यांची, तर काँग्रेसचे उत्तम पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे कोडोलीच्या जनसुराज्यच्या सदस्या गीता प्रमोद पाटील यांची, तर उपसभापतिपदी लक्ष्मी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. शाहूवाडी येथे शिवसेनेच्या सुनीता पारळे यांची सभापतिपदी, तर विजय खोत यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. हातकणंगले पंचायत समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे महेश पाटील (चंदूर) यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे राजकुमार भोसले(नरंदे) यांची बिनविरोध निवड झाली.

शिरोळ पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या मिनाज जमादार यांची, तर उपसभापतिपदी राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाचे मल्लू खोत यांची बिनविरोध निवड झाली आहे. गगनबावडा पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या संगीता पाटील यांची, तर उपसभापतिपदी पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हातकणंगले येथे भाजप, जनसुराज्यने संघर्ष टाळला

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम म्हणून हातकणंगले येथे भाजप आणि जनसुराज्यने संघर्ष टाळला असल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी प्रकाश आवाडे यांनी जोडणी घालत त्यांची ताराराणी आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष आणि काँग्रेसच्या ११ जणांना सहलीवर पाठविले होते. येथे भाजपचे सहा, तर जनसुराज्यचे पाच सदस्य होते; मात्र प्रकाश आवाडे यांनी राज्यात आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी या दोन्ही पक्षांचे ११ सदस्य सभापती निवडीवेळी गैरहजर राहिले.
 

 

Web Title: Panchayat Samiti Elected as Chairperson: Congress, Shiv Sena have three Chairmen each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.