पंचगंगा प्रदूषणावर मलमपट्टीच!

By Admin | Updated: May 6, 2015 00:14 IST2015-05-05T00:59:46+5:302015-05-06T00:14:24+5:30

दुखणे कायम : जयंती नाला थांबला; पण शहरातील इतर नाल्यांतून सुमारे ५० एमएलडी सांडपाणी थेट नदीत

Panchanganga Pollution Polling! | पंचगंगा प्रदूषणावर मलमपट्टीच!

पंचगंगा प्रदूषणावर मलमपट्टीच!

कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला असून, तो न्यायप्रविष्ठही आहे. न्यायालयाने स्थानिक प्रशासनास तसेच संबंधित आस्थापनांना प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत, तरीही ढिलाई होताना दिसत आहे. निधी आहे, तर कामे संथगतीने सुरू आहेत. कोणाकडे निधी नसल्याने त्याच्या मागणीचे प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले आहेत, परंतु त्याच्यासाठी पाठपुरावा होताना दिसत नाही. कोल्हापूरचे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घातले आहे, असेही दिसत नाही. अशीच उदासीनता राहिली तर पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यास शंभर वर्षे लागतील हे मात्र नक्की! म्हणून या प्रश्नाकडे सरकारनेच आता गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
शहरातील ६० टक्के सांडपाणी वाहून नेणारा व पंचगंगा प्रदूषणाचा प्रमुख घटक असलेल्या जयंती नाल्यातील सांडपाणी एसटीपी प्रकल्पामुळे पंचगंगेत मिसळणे तूर्त थांबले आहे. मात्र, अद्याप दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बझार हे ३० टक्के सांडपाण्याचे स्रोत मुक्तपणे पंचगंगेत मिसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणावर अद्याप मलमपट्टीच झाली आहे, असेच म्हणावे लागेल.
कसबा बावडा व दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी (एसटीपी) शासनाकडून ७० कोटी रुपयांचा निधी मिळाला. उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या स्वनिधीतील वापरून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशिप) तत्त्वावर दोन्ही केंद्रांची उभारणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत बावडा केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांवर बंधारा बांधणे, तसेच सांडपाण्याचा उपसा करून ते एसटीपी केंद्रात आणणे ही कामे बाकी आहेत, तर दुधाळी एसटीपी केंद्राचे कामास महिन्यापूर्वी मुहूर्त सापडला आहे. बावडा एसटीपीची क्षमता ७६ एमएलडीची (दशलक्ष लिटर) असूनही सांडपाणी वळविले नसल्याने फक्त जयंती नाल्यातील ६० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार नाल्यांतील पाणी वळविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने केंद्र
पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हे प्रशासनही ठामपणे सांगू शकत नाही.
संपूर्ण शहरातील सांडपाणी वाहून नेणारे फुलेवाडी, रमणमळा, महावीर कॉलेज, जामदार क्लब, बुधवार पेठ, कावळा नाका, सीपीआर नाला, लाईन बझार, बापट कॅम्प, दुधाळी व जयंती नाला असे एकूण १२ नाले आहेत. त्यातील फक्त जयंती नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून १७ एमएलडी क्षमतेचे एसटीपी केंद्र उभारण्याची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. उर्वरित नाल्यांतील पाणी वळवून जवळच्या केंद्रात नेण्यासाठी २६ कोटींची गरज आहे. सर्व नाल्यांतील पाण्याचा उपसा करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केल्याखेरीज पंचगंगेचे दुखणे कमी होणार नाही.

Web Title: Panchanganga Pollution Polling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.