शिरगाव येथे घरावर दरड कोसळली, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:51+5:302021-07-23T04:16:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरगाव : दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे शिरगाव येथील शिवाजी बापू पाटील यांच्या बंगल्यावर पश्चिमेकडील ...

Pain at home in Shirgaon, four injured | शिरगाव येथे घरावर दरड कोसळली, चार जखमी

शिरगाव येथे घरावर दरड कोसळली, चार जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरगाव : दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे शिरगाव येथील शिवाजी बापू पाटील यांच्या बंगल्यावर पश्चिमेकडील उंच डोंगरावरील झाडांसह मोठी दरड कोसळली. त्यांचे घरासह प्रापंचिक साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले, तर कुटुंबातील आठ जणांचे प्राण वाचले. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी, तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवार सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. गावाच्या सभोवती उंच डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी अनेकांची घरे आहेत. तसेच येथे मोठमोठी वडाची व पिंपळाची झाडे आहे. यातील एक झाड मोठ्या दरडीसह खाली कोसळत आले होते. शिवाजी पाटील यांचे चिरंजीव उदय पाटील हे आपल्या बंगल्याच्या आवारात खोऱ्याने पाणी काढत होते. त्यांना झाडांसह दरड कोसळून खाली येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. पाटील यांच्या पश्चिम बाजूकडील भिंत कोसळून आत बंगल्यात मोठ्या झाडांसह दरडीचा भाग कोसळला. यावेळी घरात पाटील यांच्यासह त्यांची पत्नी, दोन सुना, मुलगा, तीन नातवंडे होते. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी लोक गोळा झाले. तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदी येथे आले आणि बचाव कार्य सुरू केले. शिवाजी पाटील, शशिकला पाटील, संतोष पाटील, शुभांगी पाटील, अश्विनी पाटील हे जखमी झालेत. त्यांना गावकऱ्यांनी बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरड कोसळून बंगल्यासह आतील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कसबा तारळेचे मंडल अधिकारी शिवाजीराव भोसले, तलाठी सरदार चौगले, पोलीस पाटील संजय कांबळे, सरपंच रूपाली राजेंद्र व्हरकट, उपसरपंच शरद कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी पाहणी केली. यावेळी अंधार व जोरदार पावसामुळे मदतकार्यात व्यत्यय येत होता. पंचनामा उद्या सकाळी करण्यात येणार आहे.

माळीण ची आठवण ताजी.

पंधरा दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये शिरगाव येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमीत व्यक्त केलेल्या धोक्याला आजच्या घटनेने दुजोरा मिळाला. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा माळीणसारखी घटना घडण्याचा धोका आहे. आजची घटना जर रात्री घडली असती तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. पाटील कुटुंबाचे दैव बलवत्तर होते म्हणून ते मोठ्या संकटातून बाहेर पडले आहेत.

२२ शिरगाव .....

फोटो : शिरगाव (ता.राधानगरी) येथील शिवाजी बापू पाटील यांच्या बंगल्यावर दरडीसह झाड कोसळले. यावेळी मदतकार्यात सहभागी झालेले तरुण मंडळाचे कार्यकर्ते. : छाया : बाजीराव फराकटे

-

Web Title: Pain at home in Shirgaon, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.