आजऱ्यात भाताला क्विंटलला २५६८ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:37+5:302021-01-13T04:59:37+5:30
सदाशिव मोरे। आजरा भात पिकाची आधारभूत (हमीभाव) दराने खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघाची ...

आजऱ्यात भाताला क्विंटलला २५६८ रुपये भाव
सदाशिव मोरे।
आजरा
भात पिकाची आधारभूत (हमीभाव) दराने खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघाची निवड केली आहे. भाताला आधारभूत दराप्रमाणे प्रतिक्विंटल १८६८ रुपये व बोनस म्हणून राज्य शासनाकडून ७०० रुपये असे एकूण २५६८ रुपये मिळणार आहेत. काटामारीतून होणारी फसवणूक व लूट थांबविण्याची गरज असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये ३ डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने आजरा तालुक्यासाठी आधारभूत किमतीनुसार भात खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनने केंद्र सुरू केले आहे.
आजरा तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भाताच्या सुगीमध्ये व्यापाऱ्यांकडून दर कमी करणे, काटामारीबरोबर कमी रक्कम देणे, पिकांच्या उत्पादनापूर्वीच कमी पैसे देऊन शेतकऱ्यांना फसवणुकीचे प्रकार तालुक्यात सर्रास होत आहेत. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळण्यासाठी किमान धान्य खरेदी योजना देशभर राबविली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या अधिपत्याखाली आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांचे भात खरेदी करणे व त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे हा हेतू आहे. विनापरवाना भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चाप बसणार आहे. हमीभावापेक्षा कमी दर, काटामारी यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.
-------------------------------------
* आधारभूत दर व बोनसची रक्कम खात्यावर
किसान भात खरेदी-विक्री संघाने अन्नपूर्णा राईल मिल एम.आय.डी.सी. आजरा येथे भात खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ अ, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक यासह भात पूर्णपणे वाळवून व चाळणी करून विक्रीसाठी आणावे. भाताच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मार्केटिंग फेडरेशनकडून ऑनलाईन रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती अन्नपूर्णा राईस मिलचे सूर्यकांत नामदेव नार्वेकर यांनी दिली.
-------------------------------------
* शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल..
मार्केटिंग फेडरेशनने भाताची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे वजनकाटा व दरातील फसवणूक थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्या सोन्याला चांगला दर मिळाला आहे.