पॅकर्स क्रिकेट क्लबच्या टी २० स्पर्धेचे चषक अनावरण
By भीमगोंड देसाई | Updated: February 28, 2023 21:26 IST2023-02-28T21:25:02+5:302023-02-28T21:26:08+5:30
आजपासून स्पर्धा : घावरी, गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती

पॅकर्स क्रिकेट क्लबच्या टी २० स्पर्धेचे चषक अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील पॅकर्स क्रिकेट क्बलतर्फे आज, बुधवारपासून शास्त्रीनगर मैदान आणि इचलकरंजी येथे होणाऱ्या २५ वर्षाखालील निमंत्रितांचे टी २० क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी चषक अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय संघाचा माजी कसोटी खेळाडू कर्सन घावरी, महाराष्ट्र संघाचा माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, माजी रणजी खेळाडू रमेश हजारे, मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यप्रसाद हॉलमध्ये कार्यक्रम झाला. दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन आज, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
यावेळी घावरी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रिकेटमध्ये लक्ष घालावे, असे आवाहन केले. गुंजाळ यांनी क्रिकेटमध्ये भरपूर संधी आहेत. त्यामुळे प्रशिक्षकाच्या मदतीने आणि आई- वडिलांच्या पाठबळावर क्रिकेटमध्ये भरारी घ्यावी, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रिकेटसाठी मोठे योगदान दिलेले बाळ पाटणकर यांच्यासह स्पर्धेसाठी मदत केलेल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पॅकर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुधीर पारखे, उपाध्यक्ष विजय सोमाणी, सचिव नंदकुमार बामणे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"