‘सत्तारूढ’मध्ये ‘पी. एन.’ यांचाच वरचष्मा
By Admin | Updated: April 9, 2015 00:58 IST2015-04-09T00:55:24+5:302015-04-09T00:58:12+5:30
‘गोकुळ’ निवडणूक : ‘राष्ट्रवादी’ला रोखण्यात यश : वसंत खाडेंना संधी देऊन नरके यांना चाप

‘सत्तारूढ’मध्ये ‘पी. एन.’ यांचाच वरचष्मा
विश्वास पाटील - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलची रचना करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार पी. एन.पाटील यांचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले. पी. एन. यांनी एकाच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला रोखताना स्वत:ची एक जागा वाढविलीच व शिवाय ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनाही रोखण्याचा बंदोबस्त करून ठेवला.
सत्तारूढ पॅनलमधून पी. एन. यांचे पुतणे उदय निवासराव पाटील, सुरेश पाटील, पी. डी. धुंदरे व वसंत खाडे या चौघांना संधी मिळाली. मावळत्या आघाडीत त्यांना तीन जागा होत्या. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सवतासुभा मांडल्याने त्यांच्या गटाची एक जागा कमी झाली. त्या जागेवर पी. एन. यांनी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते वसंत खाडे (रा. सांगरूळ) यांना सामावून घेतले. ‘गोकुळ’मध्ये पी. एन. व माजी अध्यक्ष अरुण नरके एकत्र असले तरी त्यांच्यात हाडवैर आहे; कारण विधानसभेला हे दोघे एकमेकांच्या विरोधात शड्डू मारतात. त्यामुळे अरुण नरके यांना पॅनलमध्येच घेण्यास पी. एन. यांचा विरोध होता; परंतु संदीप नरके यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्यात त्यांना यश आले नाही. दूध संघाच्या राजकारणाचे नेते महाडिक-पीएन असले तरी तेथील व्यवस्थापनांवर नरके व दिवंगत नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांचा जास्त प्रभाव राहिला. आता चुयेकर यांच्या निधनानंतर नरके यांचे वजन वाढले आहे. मावळत्या संचालक मंडळातील पी. एन. यांना मानणाऱ्या संचालकांपैकी कुणाकडेच नरके यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती; किंबहुना ते सगळे नरके यांच्या हो ला हो म्हणणारेच होते. आता वसंत खाडे तसे नरके यांच्या सगळ्याच गोष्टींना संमती देणारे नाहीत. कुंभी-कासारी कारखान्याच्या राजकारणातही खाडे व आमदार चंद्रदीप नरके यांचे राजकीय हाडवैर आहे; त्यामुळे खाडे दूध संघात जाणे हे नरके यांच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरले आहे. गटाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून वसंत खाडे हे नरके यांच्या प्रत्येक गोष्टीला रोखू शकतात.
दुसरे असे की, अगदी सुरुवातीपासूनच पी. एन. हे राष्ट्रवादी व भाजप या दोन पक्षांना पॅनलमध्ये जागाच देणार नाही असे सांगत होते. ते खरे करून दाखविण्यातही ते यशस्वी झाले. राष्ट्रवादीकडून तब्बल १५ जणांची यादीच काँग्रेसच्या नेत्यांकडे दिली होती व त्यांतील कुणालाही संधी द्या, असा त्यांचा आग्रह होता; परंतु पी. एन. यांनी त्या यादीला केराची टोपली दाखविली. एकही जागा देण्यास ते तयार नव्हते. शेवटी महाडिक यांनीच आग्रह धरल्याने भुदरगडमधून विलास कांबळे या माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यास संधी मिळाली. पी.एन. या सगळ्या घडामोडींत त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या संजयबाबा घाटगे यांची उमेदवारी टिकवू शकले नाहीत. त्यात मात्र त्यांना अपयश आले. पी. एन. यांचा संजयबाबा यांच्यासाठी शेवटपर्यंत आग्रह होता; परंतु कागल तालुक्याच्या राजकारणातील प्रबळ गट असलेल्या मंडलिक गटाने सतेज पाटील यांच्याशी संधान बांधल्यावर पी. एन. यांच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या. मंडलिक गटाने संजयबाबा यांची पाठराखण करावी असा प्रयत्न होता; परंतु त्यांनी बरोबर त्याच्या उलट भूमिका घेतल्याने आमदार हसन मुश्रीफ यांच्या आग्रहाला त्यामुळे बळकटी आली. संजयबाबा घाटगे यांच्यासाठी आग्रह धरणारा कुणी गॉडफादरच राहिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची किमान पाचशे मते आहेत. मंडलिक गट विरोधात गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा अंगावर घ्यायला नको म्हणून अंबरीश घाटगे यांचा पत्ता कापण्याचा निर्णय झाला
रामराजेंचा पत्ता दुसऱ्यांदा कट
खासदार धनंजय महाडिक यांचा रामराजे कुपेकर यांच्यासाठीही खूप प्रयत्न होता. त्यासाठी चंदगड तालुक्यातील आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याही ताकदीचा त्यांनी वापर करून पाहिला; परंतु त्यालाही पी. एन. यांनी दाद दिली नाही. गडहिंग्लज तालुक्यात दिवंगत नेते राजकुमार हत्तरकी हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते. त्यामुळे तिथेही राष्ट्रवादीला कट्ट्यावर बसवून सदानंद हत्तरकी यांना संधी देण्यात देण्यात आली. सदानंद यांना उमेदवारी द्यावी यासाठी पी. एन. व आमदार महाडिक यांचाही आग्रह राहिला. खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी एका टप्प्यावर फारच आग्रह धरल्यावर ‘तुम्ही त्यांच्यासाठी (रामराजेंसाठी) स्वतंत्र पॅनल करा...’ असेही सुनावले. रामराजे यांनी दोन वेळा प्रयत्न करूनही त्यांना ‘गोकुळ’च्या पॅनलमध्ये संधी मिळविण्यात अपयश आले.