पी. एन. पाटील : वाढदिवस विशेष-उल्हास पवार मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:08+5:302021-01-08T05:16:08+5:30

माझे त्यांच्याशी खूप जुने ऋणानुबंध आहेत. ज्या नेत्याने आयुष्यभर फक्त आणि फक्त काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही विचार केला नाही, अशा ...

P. N. Patil: Birthday Special - Ulhas Pawar Interview | पी. एन. पाटील : वाढदिवस विशेष-उल्हास पवार मुलाखत

पी. एन. पाटील : वाढदिवस विशेष-उल्हास पवार मुलाखत

माझे त्यांच्याशी खूप जुने ऋणानुबंध आहेत. ज्या नेत्याने आयुष्यभर फक्त आणि फक्त काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही विचार केला नाही, अशा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रतापराव भोसले हे प्रदेशाध्यक्ष असताना उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी आम्ही, त्यांनी आयोजित केलेल्या राजीव गांधी दौडला दोनवेळा येत असे. एखाद्या दिवंगत नेत्याच्या जयंतीनिमित्त इतका चांगला कार्यक्रम आयोजित करणे व त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते जमा होणे, ही त्या नेतृत्वाची सामान्य जनतेविषयी असलेली बांधिलकी दर्शवते. नेत्याची कार्यकर्ते व जनतेशी नाळ असल्यानेच पी. एन. पाटील इतकी वर्षे हा कार्यक्रम उत्तम पध्दतीने आयोजित करत आहेत. पी. एन. पाटील हे प्रतापराव भाऊंचे खूप चाहते होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. या दोन्ही घराण्यांशी त्यांचे आजही तितकेच चांगले संबंध आहेत. त्यांच्यासारखे धडाडीचे व हाडाचे कार्यकर्ते आजही पक्षात आहेत, म्हणूनच काँग्रेसचे अस्तित्व आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत काहीवेळा अपयश आले, तरी त्यांनी मतदार संघाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यामुळेच ते गेल्या निवडणुकीत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर १९९९ मध्ये काँग्रेस अडचणीत आहे म्हटल्यावर ते खंबीरपणे पक्षाच्या उभारणीसाठी उभे राहिले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पक्षाची बांधणी केली व धडाडीने जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे नेतृत्व केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशात जे मोजके पुतळे आहेत, त्यातील एक पुतळा पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात बसविण्यात आला आहे. गांधी घराण्यासाठी अभंग निष्ठा हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट‌्य आहे. नेते श्रीपतराव बोंद्रे यांचाही राजकीय वारसा त्यांना लाभला. पी. एन. पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची काँग्रेसला आज खूप गरज आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीस माझ्या मनापासूून शुभेच्छा आहेत.

उल्हास पवार,

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

(शब्दांकन : विश्वास पाटील)

Web Title: P. N. Patil: Birthday Special - Ulhas Pawar Interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.