मुरगूडमध्ये लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:48+5:302021-05-24T04:22:48+5:30

मुरगूड : मुरगूड शहर आणि परिसरातील पन्नास गावांतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुरगूड ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ...

Oxygen production project soon in Murgud | मुरगूडमध्ये लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

मुरगूडमध्ये लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

मुरगूड : मुरगूड शहर आणि परिसरातील पन्नास गावांतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुरगूड ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व सिटी स्कॅन विभाग येत्या काही दिवसांत कार्यान्वित केला जाईल. तसेच ग्रामीण रुग्णालयाला ५० बेडसह अन्य सुविधा देऊन उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा लवकरच मिळवून देणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोना परिस्थितीची आढावा बैठक व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोविड केअर केंद्राला १५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन प्रदान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, आताच आरोग्य व्यवस्था भक्कम केली नाही तर पुढच्या लाटेला फार गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला कायम राहणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, रणजित सूर्यवंशी, राजू आमते, डॉ. सुनील चौगले, ॲड. सुधीर सावर्डेकर, रवी परीट, डॉ. भगवान डवरी, डॉ. अमोल पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आभार मानले.

चौकट

मुख्यमंत्र्यांचे काम प्रभावी..

मुश्रीफ म्हणाले, कोणीही कितीही टीका, आरोप करोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना महामारीत अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व नीती आयोगानेही राज्याचे कौतुक केले आहे. इंडिया टुडेचे प्रमुख संपादक प्रभू चावला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केरळचे मुख्यमंत्री विजय पेरियन यांच्याबद्दल देशाचे मत जाणून घेतले आहे. या सर्व्हेत ६५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पसंती दर्शविली आहे.

आम्ही नेमकं काय करीत आहोत?

भारतापेक्षा बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न २८० कोटी डॉलर्स वाढले असल्याकडे लक्ष वेधताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही बातमी वाचून मी तर हडबडून गेलो, तिथेही कोरोना आहेच. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या देशापेक्षा दरडोई उत्पन्नामध्ये आपण दुपटीहून अधिक होतो. आपण नेमके काय करीत आहोत, हेच आम्हाला समजेना झालंय, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

मोफत लसीकरणाला काय अडचण

मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारतीय रिझर्व बँकेने कालच केंद्र सरकारला एक लाख कोटी रुपये दिले आहेत. या पैशात संपूर्ण देशाचे मोफत लसीकरण व्हायला काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी केला.

फोटो ओळ

मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने मुरगूड कोविड केअर सेंटरला पंधरा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन प्रदान करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी प्रताप ऊर्फ भय्या माने, प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, श्रीमती शिल्पा ठोकडे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Oxygen production project soon in Murgud