थकबाकीचे डिजिटल फलक- इचलकरंजीत खळबळ :
By Admin | Updated: September 10, 2014 23:54 IST2014-09-10T23:28:49+5:302014-09-10T23:54:10+5:30
पाच सहकारी संस्थांचे थकबाकीदार सभासद

थकबाकीचे डिजिटल फलक- इचलकरंजीत खळबळ :
इचलकरंजी : येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयासमोर सहकारातील पाच संस्थांकडे २८ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी असल्याबद्दलचे डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संस्थांची नावे व त्या संस्थांकडे असणाऱ्या संचालक मंडळाचाही उल्लेख फलकावर असल्याने हा विषय शहरात चांगलाच चर्चेचा झाला आहे.
वस्त्रोद्योगातील काही सहकारी संस्था व बॅँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने त्या अवसायनात गेल्या. या संस्थांकडे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कर्ज होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने या संस्थांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जाची थकबाकी झाली आहे. या थकबाकीचे डिजिटल फलक प्रशासकांनी शाखा कार्यालयासमोर उभे केले आहेत. श्री पंत वस्त्रोद्योग सहकारी संस्था मर्यादित, तिळवणी या संस्थेकडे २ कोटी ७६ लाख ६६ हजार रुपये, डेक्कन को-आॅप. टेक्स्टाईल इंडस्ट्रीजकडे ३ कोटी २१ लाख ९२ हजार रुपये, दि डेक्कन को-आॅप. स्पिनिंग मिल्सकडे ११ कोटी ६२ लाख ६७ हजार रुपये, नवरंग को-आॅप. प्रोसेसर्सकडे ३ कोटी ४८ लाख २१ हजार रुपये व दि इचलकरंजी नागरी सहकारी बॅँकेकडे ७ कोटी २२ लाख ७५ हजार रुपये थकीत असल्याचे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. तसेच या थकबाकीच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांकडून सामुदायिकरीत्या किंवा वैयक्तिकरीत्या वसुली केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.