पॉकेटमनीतून ८० कुटुंबांच्या पोटाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:37+5:302021-05-12T04:23:37+5:30
गांधीनगर : (बाबासाहेब नेर्ले): कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचे अर्थचक्र थांबले आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना तर रोजचा दिवस दिव्य ...

पॉकेटमनीतून ८० कुटुंबांच्या पोटाला आधार
गांधीनगर : (बाबासाहेब नेर्ले): कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचे अर्थचक्र थांबले आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना तर रोजचा दिवस दिव्य ठरत आहे. अशा परिस्थितीत गांधीनगरमधील तीन युवतींनी आपल्या पॉकेटमनीमधून ८० गरीब कुटुंबांना अन्नधान्यांचे किट देऊन त्यांच्या उपजीविकेसाठी हातभार लावला. अडचणीच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा आदर्श या युवतींनी जोपासला आहे.
गांधीनगर येथील तमन्ना रमेश वाच्छानी, संजना वलेछा व प्रशिता नरसिंघांनी या महाविद्यालयीन युवती. कोरोनाच्या साथीमुळे सध्या बिघडलेल्या परिस्थितीची माहिती त्यांना प्रसारमाध्यमातून होत असते. वृत्तपत्रांमध्ये व टीव्ही चॅनलमध्ये येणाऱ्या बातम्या, गोरगरीब कामगार कुटुंबियांचे होत असलेले हाल पाहून अशा कुटुंबीयांना आपणदेखील मदत केली पाहिजे ही कल्पना मनात घर करून होती. यासाठी त्यांनी आपल्या फ्रेंड्स व्हाॅट्सॲप ग्रुपवर गरीब कुटुंबे, कामगारांचे रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ती वेळ निभावून नेण्यासाठी आम्हाला मदत करा, असे आवाहन केले. त्याला अनेक लोकांनी ती दाखवीत मदतीचा हात पुढे केला, तसेच या तीन मुलींनी आपल्या पॉकेटमनीमधून जमलेले पैसेदेखील या कामासाठी घातले. घरातील कुटुंबियांच्या मदतीने अन्नधान्याची किट तयार केले. गडमुडशिंगी, उंचगाव, गांधीनगर, चिंचवाड या परिसरातील तब्बल 80 गोरगरीब कुटुंबीयांना दहा दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचे किट करून वाटप केले, तसेच गांधीनगर पोलीस ठाण्यातही गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यासाठी गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर व पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पोलिसांची मदत
गांधीनगर पोलीस ठाण्यातील मोहन गवळी, आकाश पोवार, चेतन बोंगाळे, उदय खुडे, अल्ताफ शेख व इतर कर्मचाऱ्यांनी या युवतींसोबत गरजू कुटुंबीय शोधून त्यांना अन्नधान्य किट पोहोचवले. या युवतींच्या दातृत्वाचा इतरांनीही आदर्श घेत आपल्याजवळच्या गरजूंना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांनी केले.
फोटो ओळ-गांधीनगरातील तीन युवतींनी पॉकेटमनीतून तब्बल 80 कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वाटप केले. यावेळी सपोनि दीपक भांडवलकर, तमन्ना वच्छानी, संजना वलेछा, प्रशिता नरसिंघानी, पोलीस कर्मचारी व कुटुंबे. ११ गांधीनगर हेल्प